मुंबई : महाडमध्ये पूल वाहून गेल्याच्या या अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर सोशल मीडियावर या घटनेला जबाबदार कोण याच्या चर्चा सुरु झाल्या. अनेक पोस्ट प्रतिक्रियांच्या रुपात व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबूक सारख्या सोशल मीडियावर फिरु लागल्या. अशीच एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधल्या गेलेल्या पुलाची.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रतापगडाच्या पायथ्याशी "पार्वतीपूर" नावाचे एक गाव आहे. नंतर त्यांचे "पार" असे नाव पडले. पार गावाजवळ शिवरायांनी एक पूल बांधून घेतला होता. त्याच खणखणीत नियोजनापूर्व केलेले बांधकाम अजूनही शाबूत आहे.


८ मीटर रुंदीचा हा पूल बहुधा प्रतापगडाच्या उभारणीच्या काळात म्हणजे १६५६-१६५८ या दरम्यान बांधला गेला असावा. कोयना नदी ओलांडण्यासाठी ५२ मीटर लांब,८ मीटर रुंद असा भक्कम दगडी पूल निर्माण केलेला आहे. पुलाला असणाऱ्या पाच अधारांवर पुलाच्या चार कमानी तयार झाल्या आहेत. त्याची उंची जास्तीत जास्त पंधरा मीटर भरते. पाण्याच्या उगमाकडून येणाऱ्या जोरदार प्रवाहाने पुलाच्या कमानींना धोका पोहचू नये म्हणून कमानीमधील खांबांना काटकोन तिरका आकार दुभागतो. हे सारेच बांधकाम चुन्यात केलेले आहे.


सुमारे साडेतीनशे वर्षां नंतरही हा पूल अद्यापही एकही चिरा न ढासळता शाबूत आहे. दगडांच्या फटीमध्ये साधे झाडही उगवलेले नाही पुलाच्या दोन्ही बाजूंना हातभार उंचीचा ३०सेमी/१ फूटी दगडी कठाडा आहे. पाण्याचा प्रवाहाचा तडाखा सोसत, पाणी झिरपण्याच्या धोक्यावर मात करत, काही शतक देखभाल न कराव लागण हेच त्या भक्कम बांधकामाचे वैशिष्ट्य आहे.