मुंबई : शुजीत सरकार दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन यांची दमदार भूमिका असलेला 'पिंक' हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि एका चर्चेला सुरुवात झाली... या चर्चेत 'पिंक टॅक्स' हा शब्ददेखील तुम्ही अनेकदा ऐकला असेल... पण, काय आहे बरं हा ''पिंक टॅक्स' आणि कुणासाठी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॉर्पोरेट जगतामध्ये महिलांना पुरुषांपेक्षा मोबदल्यात कमी मेहताना दिला जातो, हे तर उघडच आहे... आत्तापर्यंत अनेकदा समोर आलंय. परंतु, जगातील काही ठिकाणी एखाद्या वस्तूसाठी किंवा सेवेसाठी पुरुषांपेक्षा महिलांना जास्त किंमत चुकवावी लागते, हे तुम्हाला माहीत आहे का? 


काय आहे 'पिंक टॅक्स'


सामाजिक मान्यतेनुसार बऱ्याचदा निळा रंग हा पुरुषांचा आणि गुलाबी रंग हा स्त्रियांचा असा जणू काही अलिखित नियमच आहे. म्हणूनच की काय खास महिलांसाठी तयार केलेल्या प्रोडक्टसाठी मार्केटिंग कंपन्याही गुलाबी रंगच निवडतात. या खास महिलांसाठीच्या प्रोडक्टसाठी महिलांना अधिक किंमत चुकवावी लागते. उदाहरणार्थ, एखाद्या सारख्याच कंपनीच्या रेझर किंवा डिओड्रन्टची किंमत पुरुष व्हर्जनसाठी कमी परंतु, महिलांसाठी जास्त असते. विक्रेत्यांकडून महिलांसाठी ही अधिक किंमत आकारली जाते. मग ते कॉस्मॅटिक्स असो, ड्राय क्लिनिंग असो किंवा साधा हेअरकट... हीच अधिक किंमत 'पिंक टॅक्स' म्हणून ओळखली जाते.  


एखाद्या मॉलमध्ये जाऊन तुम्ही एक पुरुषाचा आणि एक महिलेचा शर्ट विकत घेतलात तर महिलेच्या शर्टसाठी तुम्हाला अधिक किंमत चुकवावी लागू शकते... अगदी आपण दोघांनाही 'शर्ट' म्हणत असलो आणि दोन्ही शर्ट सारख्याच क्वालिटीचे असले तरी... हेच डिओड्रन्ट, पेन रिलिव्हर्स आणि सौंदर्य प्रसाधनांच्या बाबतीतही हेच...


स्त्री-पुरुष दुजाभाव


याचाच अर्थ, अनेकदा महिलांना मिळणारा मेहताना आणि महिलांना वस्तू विकत घेण्यासाठी होणारा खर्च यामध्ये कमालीचा दुजाभाव आढळतो. खास महिलांसाठी तयार केल्या जाणाऱ्या वस्तूंसाठी किंवा सेवेसाठी अधिक किंमत का आकारली जाते? याचं समाधानकारक उत्तर मात्र अनेकदा मिळत नाही. यालाच आर्थिक भाषेत 'किंमत दुजाभाव' म्हटलं जातं.


दुतोंडी जगाच्या गप्पा...


स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारणारं जग किती दुतोंडी आहे? हेही यातून स्पष्टपणे दिसून येतं. गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेतील महिला हा 'पिंक टॅक्स' संपुष्टात यावा यासाठी लढा देत आहेत.