निलेश वाघ, झी २४ तास, मालेगाव: जळगावसह खानदेश परिसरासाठी  वरदान ठरलेल्या  गिरणा धरणाच्या  पाणीसाठ्यात  झपाट्याने असून  ९२. २५  टक्के धरण भरले आहे. कोणत्याही क्षणी  धरणातून  पाण्याचा  विसर्ग केला जाईल. त्यामुळे प्रशासानाने  नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या १५ वर्षात प्रथमच गिरणा धरणात इतका पाणीसाठी जमा झाला आहे. त्यामुळे खानदेश परिसराचा पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. धरणाच्या  उगमस्थान असलेल्या कळवण, सुरगाणा व सटाणा  परिसरात गेल्या काही दिवसांपासून  दमदार पाऊस कोसळत आहे.


चनकापुर ,पुनद धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर हरणबारी व  केळझर दुथडी भरून वाहू लागल्याने गिरणा व मोसम नदीला पूर आला आहे. यामुळे गिरणा धरणाच्या पातळीतही कमालीची वाढ झाली आहे. आजमीतिस धरणाची पाणीपातळी ९२.२५  टक्क्यांपेक्षा अधिक झाली असून मालेगाव व नांदगांवसह चाळीसगांव , भडगाव, पाचोरा या गावांचा पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न मिटला आहे. 


याशिवाय, जळगाव जिल्ह्यातील शेती सिंचनाला प्रश्नही मार्गी लागणार आहे. गेल्यावर्षी  गिरणा धरण अवघे ४९ टक्के भरले होते. यंदा मात्र सप्टेंबरमध्ये धरणाच्या पाणीपातळीने ९२ टक्क्याचा  आकडा पार केला आहे. दिवसेंदिवस  पाणीसाठ्यात  वाढ होत आहे . वरुणराजाची अशीच कृपा दृष्टी  राहिल्यास  २००४ नंतर गिरणा  धरण  ओव्हर फ्लो  होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. परंतु गिरणा धरण असलेला नांदगाव तालुका अद्यापही कोरडाच आहे.