नाशिकमध्ये शिवसेनेत फाटाफूट, बंडखोर उमेदवाराच्या विजयात राष्ट्रवादीचा `हातभार`
या निवडणुकीत शिवसेनेचे पाच नगरसेवक फुटले
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक: सिन्नर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी बुधवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे नगरसेवक फुटल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यासाठी शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडून मदत पुरवण्यात आली. त्यामुळे सरकारमध्ये एकत्र नांदणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे.
'त्यावेळी सर्जिकल स्ट्राईकच्या फुशारक्या मारणारे आज राष्ट्रवादीकडे भीक मागतायत'
प्राथमिक माहितीनुसार, उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून प्रणाली गोळेसर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे शिवसेनेच्या बाळासाहेब उगले यांनी बंडखोरी करत त्यांच्याविरोधात अर्ज भरला होता. अखेर बुधवारी झालेल्या निवडणुकीत बाळासाहेब उगले यांनी आमदार माणिकराव कोकाटे गटाच्या सहाय्याने पंधरा मते मिळवीत . तर प्रणाली गोळेसर यांना १४ मते मिळाली. बाळासाहेब उगले यांचा हा निसटता विजय शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी पक्षाविरोधात मतदान केले. त्यामुळे आता या नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेसची फुस होती का, ही चर्चा आता रंगली आहे.
उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना खास निरोप, म्हणाले...
यापूर्वी पारनेरमधील पाच शिवसेना नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचंड नाराज झाले होते. शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मातोश्रीवर जाऊन त्यांची समजूत काढावी लागली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना त्या सर्व नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत पाठवा, असा संदेशही दिला होता. अखेर हे नगरसेवक पुन्हा शिवसेनेत परतले होते. यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या फाटाफुटीला राष्ट्रवादीचा हातभार लागल्याने आता काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.