शिवसेनेकडून धनराज महालेंचा गेम; उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्ता कापला
लोकसभेला पराभव झाल्यानंतर महाले पुन्हा शिवसेनेत आले.
नाशिक: विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी उमेदवारी याद्या जाहीर केल्यानंतर अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. त्यामुळे क्षणाक्षणाला रंजक घडामोडी सुरु आहेत. नाशिकमध्येही अशाच एका घटनेने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. याठिकाणी शिवसेनेने माजी आमदार धनराज महाले यांचा गेम केल्याची चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे आमदार असलेल्या धनराज महाले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
मात्र, राजकीय समीकरणे बदलताच त्यांनी काही दिवसांपूर्वीच पुन्हा मनगटावर शिवबंधन बांधले होते. यानंतर शिवसेनेकडून त्यांना दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. महाले यांनी गुरुवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्जही भरला होता. मात्र, दरम्यानच्या काळात राजकीय चक्रे फिरली आणि सेनेने महालेंऐवजी भास्कर गावित यांना उमेदवारी फिरवली.
महाले यांना मातोश्रीवरून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाले यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. महाले यांची उमेदवारी रद्द केल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. बहुतांश राजकीय पक्षांनी दिंडोरीतील उमेदवार जाहीर केल्यामुळे पुन्हा बंडखोरी करण्याचा पर्यायही संपुष्टात आला आहे.
लोकसभेला पराभव झाल्यानंतर महाले पुन्हा शिवसेनेत आले. मात्र, महालेंना उमेदवारी देण्यात आल्याने शिवसेनेचा एक गट नाराज होता. त्यामुळेच त्यांचा पत्ता ऐनवेळी कापण्यात आल्याची चर्चा आहे.