Shiv Jayanti 2024: जो बाळा जोजो रे जोssजो; बाळ शिवाजींसाठी पाळणा म्हणत पार पडला शिवजन्मोत्सव

Mon, 19 Feb 2024-9:45 am,

Shiv Jayanti 2024: 19 फेब्रुवारी 2024 अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती. या खास दिवसाच्या निमित्तानं शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. 

येथील किल्ले शिवनेरीवर शासकीय शिवजयंती साजरी करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. 

सकाळी 6 वाजता पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख यांच्या हस्ते गडदेवता शिवाई देवीचा अभिषेक करण्यात आला. 

अभिषेकानंतर शिवाई देवी मंदिर ते शिवजन्मस्थळ अशी पालखी मिरवणूक निघाली. शिवजन्म स्थळी उपस्थित महिलांनी पाळणा गाऊन शिवजन्मोत्सव साजरा केला. यावेळी किल्ला परिसरात हजारो शिवभक्त उपस्थित होते. 

 

शिवजन्मोत्सव पार पडल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना राज्य शासन पोलीस दलाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या मानवंदनेचा स्वीकार केल्यानंतर मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केलं. 

 

शिवजयंतीच्या निमित्तानं शिवनेरी किल्ल्यावर अनेक साहसी खेळांचं प्रदर्शन आणि कलाविष्कार सादर करण्यात आले. फक्त शिवनेरीच नव्हे, तर सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा केली जात आहे. 

मॅरेथॉन म्हणू नका, रक्तदान शिबिरं म्हणू नका किंवा मग गडकिल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहिमा म्हणू नका. अनेक मार्गांनी शिवरायांना शिवभक्त मानाचा मुजरा करताना दिसत आहेत. 

 

तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव कसा साजरा करत आहात? कमेंटमध्ये सांगा 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link