डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : अडीच वर्षे खटला, 11 वर्षांनी निकाल...; आतापर्यंत काय काय घडलं?

नम्रता पाटील Fri, 10 May 2024-1:20 pm,

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या खटल्याचा निकाल आज 10 मे 2024 रोजी जाहीर करण्यात आला. तब्बल 11 वर्षांनी पुणे सत्र न्यायलयाकडून दाभोलकर हत्या प्रकरणी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. तर दोघांना दोषी ठरवले आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी विरेंद्र तावडे, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर सचिन अंदूरे, शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनवण्यात आली आहे. या प्रकरणाचा अडीच वर्ष खटला चालला. 

20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची ते मॉर्निंग वॉकला गेले असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सकाळी सव्वासातच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर अगदी जवळून पिस्तुलातून गोळ्या झाडल्या.

सुरुवातीला या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांनी केला. त्यानंतर 2014 मध्ये हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयकडून विशेष सरकारी वकील ॲड. प्रकाश सूर्यवंशी यांनी 20 साक्षीदारांची साक्ष नोंदविली. 

या प्रकरणात विरेंद्र तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांना अटक करण्यात आली होती. डॉ. तावडेला पनवेलमधील सनातन संस्थेच्या आश्रमातून अटक करण्यात आली होती.

हत्येनंतर आठ वर्षांनी म्हणजे 2021 मध्ये पुणे विशेष न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. डॉ. दाभोलकर यांची हत्या करुन अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा हेतू होता, अशी धक्कादायक बाब उघड झाली.

अटक करण्यात आलेल्या पाच आरोपीवर 2021 मध्ये आरोप निश्चित करण्यात आले. अडीच वर्षे खटला चालल्यानंतर आज निकाल जाहीर झाला. विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या न्यायालयात हा निकाल सुनावण्यात आला. 

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आलेल्या आरोपींवर कलम 302 म्हणजे हत्या, कलम 120 ब म्हणजे गुन्ह्याचा कट रचणे, त्याचप्रमाणे शस्त्र अधिनियमना संबंधीचे कलम 34 नुसार आरोप निश्चित करण्यात आले आहे. आरोपींवर युएपीए देखील लावण्यात आलेला आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link