Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठलाची महापूजा! एकनाथ शिंदेंनीच सांगितलं विठूरायाकडे काय मागितलं

Swapnil Ghangale Thu, 29 Jun 2023-10:04 am,

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकदशीनिमित्त विठ्ठल रखुमाईची विधीवत शासकीय महापूजा पार पडली.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून वृषाली श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश तसेच मंत्रिमंडळातील माझे सहकारी मंत्री, आमदार उपस्थित होते.

आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल रखुमाईची विधीवत शासकीय महापूजा करण्याचे भाग्य मला मिळाले. सलग दुसऱ्या वर्षी सावळ्या विठुरायाचे मनोहर रूप डोळ्यात साठवून ठेवत त्याची मनोभावे आराधना करण्याची संधी मला मिळाली, असं हे फोटो शेअर करताना मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं.

यंदा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मुक्काम पोस्ट वाकडीचे भाऊसाहेब मोहनीराज काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे या मानाच्या वारकरी दांपत्यासह शासकीय पूजा करण्यात आली.

काळे हे गेल्या 25 वर्षांपासून भास्कर गिरी महाराज यांच्यासोबत देवगड ते पंढरपूर अशी पायी वारी करतात.

काळे यांना देखील नमन करून त्यांना सुख शांती समाधान प्राप्त व्हावे अशी मनोकामना आपण व्यक्त केल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

जनसेवेचा जो वसा माझ्या हाती पांडुरंगाने सोपवला आहे तो असाच पुढे नेण्याचे बळ मला मिळावे एवढीच इच्छा मनोमन व्यक्त केल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं.

राज्यात नुकतीच पावसाला सुरुवात झाली असून यंदाचे पर्जन्यमान समाधानकारक ठरावे आणि राज्यातील बळीराजा सुखी समाधानी व्हावा हे आणि एवढेच मागणे आपण विठुरायाच्या चरणी मागितल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

गेल्या 17 वर्षांपासून स्वच्छता दिंडी काढण्यात येत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केल्यामुळे नागरिक स्वच्छतेबाबत जागरुक झाले आहेत. स्वच्छतेची लोकचळवळ होणे ही समाधानकारक बाब आहे. पंढरपूर येथे सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी, कचरा व्यवस्थापन चांगल्या रितीने झाले आहे, अशा शब्दांमध्ये पूजेच्या आधीच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं.

पंढरीची वारी व पालखी सोहळ्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा मूलमंत्र राज्यातील घराघरात पोहचवणाऱ्या स्वच्छता दिंडी समारोप आज मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीलाही मुख्यमंत्री उपस्थित होते.

पंढरपूरच्या वारीला शतकानुशतकांची परंपरा आहे. यात मोठ्या प्रमाणात वारकरी सहभागी होतात. त्यामुळे शासन-प्रशासनाची जबाबदारी वाढते आहे. अशावेळी स्वच्छतेचे नियोजन आणि इतर सुविधा चांगल्याप्रकारे देण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. विशेषत: स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी शासन वारकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगून स्वच्छता दिंडीत सहभागी वारकरी बंधु-भगिनींचे अभिनंदन केले.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link