Petrol Price : पेट्रोल - डिझेलच्या किमतीबाबत नवे अपडेट, जाणून घ्या केव्हा होणार दरात कपात

Surendra Gangan Fri, 09 Jun 2023-9:14 am,

Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीत कपात करण्याचे संकेत देण्यात आल्यानंतर आता ही दर कपात कधी होणार याची उत्सुकता आहे. याबाबत नवीन अपडेट समोर आलेय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवरील मार्जिनमध्ये वाढ झाली. असे असले तरी, सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या गेल्यावर्षी झालेल्या तोट्याची भरपाई भरुन काढतील तेव्हाच त्यांच्या किरकोळ किमती बदलतील, अशी शक्यता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तिन्ही पेट्रोलियम कंपन्यांनी गेल्या वर्षीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज होणाऱ्या बदलांवर बंदी घातली आहे. मात्र, त्यांनी त्यांच्या किमतीनुसार दरातही सुधारणा केलेली नाही. 

किरकोळ विक्रीच्या किमतींपेक्षा कच्च्या तेलाच्या किमती जास्त असताना गेल्या वर्षी झालेल्या प्रचंड नुकसानाची भरपाई या कंपन्या खर्च कमी करुन करत आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) देशात किरकोळ पेट्रोल, डिझेल विक्री करत आहेत. आज (9 जून 2023) महाराष्ट्रात पेट्रोल 106.90 रुपये तर डिझेल 93.48 रुपयांनी विकले जाणार आहे. कालपासून महाराष्ट्रातील किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिन्ही कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसर्‍या तिमाहीपासून पेट्रोलवर सकारात्मक मार्जिन कमावले आहे. परंतु त्या वेळीही त्यांना डिझेल विक्रीवर तोटा सहन करावा लागला होता. मात्र, गेल्या महिन्यात पेट्रोलियम कंपन्यांचे डिझेलवरील मार्जिनही 50 पैसे प्रति लिटर नफ्यासह सकारात्मक झाले. मात्र गेल्या वर्षी झालेल्या प्रचंड नुकसानीची भरपाई करण्यासाठी हे पुरेसे नाही. 

रशिया-युक्रेन युद्धानंतर मार्च 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल डॉलर139 वर पोहोचल्या. मात्र, आता या किमती डॉलर 75-76 पर्यंत खाली आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रतिलिटर 17.4 रुपये आणि डिझेलवर 27.7 रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. ऑक्‍टोबर-डिसेंबर तिमाहीत किमती कमी झाल्यामुळे तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर 10 रुपयांचे मार्जिन मिळाले, परंतु डिझेलवर प्रति लिटर 6.5 रुपयांचे नुकसान झाले. 

यानंतर, जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत त्यांचे पेट्रोलवरील मार्जिन 6.8 रुपये प्रति लिटरवर आले. पण त्याला डिझेलवर 0.5 रुपये प्रतिलिटर पॉझिटिव्ह मार्जिन मिळाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील नुकसान भरुन काढण्याबरोबरच, कच्च्या तेलाच्या कमी किमती दीर्घकाळ टिकतील की नाही याकडेही सरकारी तेल कंपन्या लक्ष ठेवून आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, "मला वाटते की तेल कंपन्या पेट्रोल, डिझेलच्या किरकोळ किमतींमध्ये सुधारणा करण्याबाबत निर्णय घेतील, त्यानंतरच कच्च्या तेलाच्या किमतींवर किमान एक तिमाही नजर ठेवली जाईल."

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link