Loksabha Election 2024 : राजं जिंकलं...! कोल्हापुरात गुलालाची उधळण करत शाहू छत्रपतींचा विजयोत्सव

Wed, 05 Jun 2024-9:11 am,

महाराष्ट्र आणि मुंबईतही भाजपला दणका मिळाला, जिथं मविआच्या उमेदवारांना जनतेनं कौल दिल्याचं पाहायला मिळालं. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातही शिवसेना शिंदे गटाच्या संजय मंडलिक यांचा दारुण पराभव झाला. मविआच्या वतीनं काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी दीड लाखांच्या मताधिक्यानं त्याचा पराभव केला.

 

कोल्हापूरात मिळालेल्या या विजयानंतर शाहू महाराज आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबानं जनमानसासह विजयोत्सव साजरा केला. जिथं एकिकडे गुलालाची उधळण होत होती, तर दुसरीकडे जनतेनं दाखवलेल्या विश्वासासाठी छत्रपती कुटुंबाकडून कृतज्ञता व्यक्त केली जात होती. 

 

विजयानंतर शाहू छत्रपती यांनी गड आला पण सिंह गेला अशी प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. लोकसभा निवडणुकीची मतदान प्रकिया पूर्ण झाल्यानंतर करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी एन पाटील यांचं अकस्मित निधन झालं. त्यामुळे शाहू महाराज यांनी गड आला पण सिंह गेला अशी प्रतिक्रिया देत दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या बद्दल दुःख व्यक्त करत ऋण व्यक्त केलं.

 

राजर्षी शाहू महाराज यांचे खरे वारसदार कोण हे कोल्हापूरच्या  जनतेनं दाखवून दिले आहे. त्यामुळे या पुढच्या काळात शाहू महाराजांच्या वारसा संदर्भातील मुद्दा पुन्हा कुणी काढणार नाही, असं विजयानंतर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी म्हटलं. 

 

शाहू छत्रपती यांनी मिळवलेल्या या विजयाचे शिल्पकार मविआ, इंडिया आघाडीसोबतच त्यांचे कुटुंबीयसुद्धा ठरले. शाहूंच्या प्रचारार्थ त्यांनी कोल्हापूर मतदार संघात येणाऱ्या प्रत्येक गावाला भेट देत जनसामान्यांचे प्रश्न जाणत त्यांना मदतीचा हात दिला. 

 

शहाजीराजे छत्रपती यांनीसुद्धा या मतदारसंघातील युवा वर्गाला एकत्र आणत प्रचाराच मोलाची भूमिका बजावली होती. तर, महिला वर्गाला संघटित करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी, संयोगिताराजे यांनीसुद्धा महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचं पाहायला मिळालं. 

 

थोडक्यात, लोकसभा निवडणुकीमध्ये शाहू छत्रपती राजेंचा विजय झाला असला तरीही हा विजय कुटुंबीयांचा, सामान्यांचा आणि छत्रपती कुटुंबावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचाच आहे हीच प्रतिक्रिया सध्या कोल्हापूर मतदारसंघातून दिली जात आहे. 

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link