सकाळी शिक्षक रात्री हमाल... गरजू विद्यार्थ्यांसाठी जीवाचं रान करणाऱ्या मास्तरांची गोष्ट

Swapnil Ghangale Mon, 17 Jul 2023-3:59 pm,

ओडिशामधील बेहरामपूरमधील सी.एच. नागेश पात्रो हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. पात्रो हे दिवसा एका खासगी विद्यापिठामध्ये पाहुणे शिक्षक म्हणजेच व्हिजीटींग फॅकल्टी म्हणून काम करतात. तर सायंकाळी स्वत: सुरु केलेल्या शिकवणीमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी शिकवणी घेतात. 

रात्रीच्या वेळी पात्रो हे बेहरामपूर रेल्वे स्थानकामध्ये हमाल म्हणून काम करतात. खासगी विद्यापीठामध्ये मिळणारे पैसे पात्रो हे त्यांच्या आई-वडिलांना पाठवतात. पात्रो यांचे आई-वडील गंजम जिल्ह्यातील मनोहर गावात वास्तव्यास आहेत. पात्रो यांचे वडील बकऱ्या चारण्याचं काम करतात. त्यामुळे वयस्कर आई-वडिलांना महिन्याच्या खर्चासाठी पात्रो दर महिना 8 हजार रुपये त्यांना पाठवतात.

2006 साली आर्थिक परिस्थितीमुळे पात्रो यांना शिक्षण अर्ध्यात सोडावं लागलं. त्यामुळेच पात्रो आता आर्थिक परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या शक्य तितक्या विद्यार्थ्यांना मोफत शिकवतात. कोणीही आर्थिक चणचणीमुळे शिक्षण सोडू नये असं पात्रो यांना वाटतं. पात्रो स्वत: मात्र अजूनही हमाली करतात.

पात्रो हे बेहरामपूर रेल्वे स्थानकामध्ये 2011 पासून हमाल म्हणून काम करतात. त्यांनी 2012 साली बाहेरुन 12 वीची परीक्षा दिली. त्यानंतर पात्रो यांनी पदवी आणि पद्युत्तर शिक्षण बहरामपूर विद्यापीठामधून पूर्ण केलं.

2020 मध्ये कोरोना साथीच्या काळात पात्रो यांच्या कमाईचं एकमेव माध्यम म्हणजेच हमालीचं कामही बंद झालं. रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याचं आपलं लक्ष्य होतं असं असं पात्रो यांनी 2020 साली सांगितलं. क वर्ग कर्मचारी म्हणून रेल्वेत काम करण्याची पात्रो यांची इच्छा होती. 

आज पात्रो हे बहरामपूरमधील एका खासगी विद्यापीठामध्ये गेस्ट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. ते आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना मोफत शिकवतात. इयत्ता आठवी ते 12 वी चे विद्यार्थी त्यांच्या शिकवणीला हजेरी लावतात. ही शिकवणी त्यांनी स्वत: सुरु केली आहे.

"मी इथे (बहरामपूर रेल्वे स्टेशनवर) 12 वर्षांपासून काम करतो. रात्री मी हमाल म्हणून काम करतो आणि सकाळी शिक्षक म्हणून. या माध्यमातून मलाही शिकता येतं. 2006 साली मला अर्ध्यात शिक्षक सोडावं लागलं. मी 2012 पासून पुन्हा शिक्षण सुरु केलं. हमाली करतानाच मी एमएची पदवी घेतली," असं पात्रो सांगतात.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link