पुणे: उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्षामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीला आणखीनच रंगत येण्याची शक्यता आहे. टेलिव्हिजनवरील 'बिग बॉस' या मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेल्या अभिजित बिचुकले यांनी बुधवारी साताऱ्यातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. ते बुधवारी पु्ण्यातील पत्रकारपरिषदेत बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी अभिजित बिचुकले यांनी अखिल बहुजन समाज सेना या नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याची घोषणा केली. तसेच आपण साताऱ्यातील पोटनिवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले. या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून स्वत: शरद पवार रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. परंतु, पवार या निवडणुकीला उभे राहिले तर आपण माघार घेऊ, असे वक्तव्य उदयनराजेंनी केले होते. 


या पार्श्वभूमीवर तुम्ही शरद पवार यांच्याविरोधात लढणार का, असा प्रश्न बिचुकले यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी म्हटले की, उदयनराजे शिवरायांच्या घराण्यात जन्माला आले आहेत. मात्र, तरीही मी लोकशाही पद्धतीने त्यांच्याविरोधात लढलो. मग आता शरद पवारांना का सोडू?, असा प्रतिप्रश्न बिचुकले यांनी उपस्थित केला. 


साताऱ्याच्या पोटनिवडणुकीसाठी शरद पवार उभे राहिले तर माघार घेईन- उदयनराजे


तसेच मला विधानसभेपेक्षा लोकसभा निवडणूक लढवणे अधिक योग्य वाटते. कारण, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर माझे प्रभुत्त्व असल्याचे बिचुकले यांनी सांगितले.


दरम्यान, अखिल बहुजन समाज सेना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातही उतरले. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक कार्यकर्त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही बिचुकले यांनी केले. 


छत्रपती उदयनराजे पवारांच्या आठवणीने रडले आणि म्हणाले...


गेल्यावर्षी साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे भोसलेंनी मी फक्त अभिजित बिचुकले यांनाच घाबरतो असे म्हटले होते. अभिजित बिचुकले यांनी आजपर्यंत नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपद अशा सर्व निवडणुका लढवून झाल्या आहेत.