पुणे: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणेकरांनी गुरुवारी आपल्या एका कृतीने नवा आदर्श घालून दिला. अलीकडच्या काळात काही ठिकाणी सार्वजनिक मिरवणुकांना प्राप्त झालेल्या उन्मादी आणि बेजबाबदार स्वरुपामुळे समाजातून चिंतेचा सूर व्यक्त केला जातो. मात्र, पुणेकरांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या कृतीने आपल्याला उत्सव साजरे करतेवेळी समाजभानही असल्याचे दाखवून दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याच्या लक्ष्मीरोड परिसरातील एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओत एक रुग्णवाहिका लक्ष्मी रोडवरील गर्दीतून वाट काढताना दिसत आहे. अनंतचतुदर्शीच्या दिवशी सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीमुळे हा परिसर अत्यंत गजबजलेला असतो. त्यामुळे याठिकाणी चालायचे म्हटले तरी कुर्मगतीने वाटचाल करावी लागते. 



अशा परिस्थितीत गुरुवारी या परिसरातून एक व्यक्तीला तातडीने रुग्णालयात नेण्याची गरज होती. मात्र, लक्ष्मी रोडवरील गर्दी पाहता ही गोष्ट अशक्यप्राय वाटत होती. मात्र, मिरवणुकीत सामील झालेल्या गणेशभक्तांनी ही गोष्ट समजताच रुग्णावाहिकेला वाट काढून दिली. काही गणेशभक्तांनी रुग्णावाहिकेच्या पुढे धावत लोकांना रस्ता मोकळा करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे एवढ्या गर्दीतूनही रुग्णवाहिकेला सहजपणे रस्ता पार करता आला. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यामुळे पुणेकरांच्या कृतीचे कौतुक केले जात आहे.