जावेद मुलानी, बारामती :  एकीकडे पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना बारामतीमध्येही आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बारामतीमधील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ४ झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२९ मार्च रोजी बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह पहिला रुग्ण आढळला होता. एका रिक्षाचालकाला कोरोना झाल्याचं उघड झाल्यानं खळबळ उडाली होती. रिक्षाचालकाला परदेशात प्रवासाची पार्श्वभूमी नव्हती, मात्र तो मुंबईत गेला होता अशी माहिती पुढे आली होती. त्याच्या रिक्षातून अनेकांनी प्रवास केल्यानं त्याच्याकडून आणखी कोण बाधित झाले असेल का याची भीती होती.


त्यानंतर सोमवारी बारामतीच्या समर्थनगरमध्ये दुसरा कोरोनाबाधित रुग्ण आढळला. विशेष म्हणजे तो भाजीविक्रेता होता. भाजी विक्रेत्याला कोरोना कसा झाला अशी चर्चा सुरु झाली होती. भाजी विक्रेता पुण्याला जाऊन आला होता अशी माहिती मिळत आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बारामतीत कोरोनाचे आणखी दोन रुग्ण वाढले आहेत. हे दोन्ही रुग्ण भाजीवाल्याचेच नातेवाईक आहेत. भाजीविक्रेत्याच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या १२ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या भाजीवाल्याचा मुलगा आणि सुन दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे एकाच घरातील तिघेजण कोरोना बाधित असल्याचं समोर आलं आहे.


बारामतीतील चारही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.


 



बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनानं लॉकडाऊनची अंमलबजावणी आणखी कठोरपणे केली आहे. बारामतीकरांनी घराबाहेर पडू नये आणि प्रशासकीय यंत्रणेला पूर्णपणे सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. बारामतीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा इतिहास लक्षात घेता त्यांना इतरांकडून कोरोनाची बाधा झाल्याचं समोर येत आहे. त्यामुळे कोरोना आणखी फैलावू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.