पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर आता कार्यकर्त्यांचीही खदखद बाहेर येताना दिसत आहे. पुण्यात गुरुवारी झालेल्या राष्ट्रवादी युवा संवाद कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी आपल्या संतापाला मोकळी वाट दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पक्ष संघटनेतील पांढरे हत्ती कुठवर पोसायचे, असा सवाल कार्यकर्त्यांनी विचारला. तरूणांना संधी द्या, चमकू थोबडे पाहून जनतेला वीट आलाय, असे परखड मत यावेळी कार्यकर्त्यांनी मांडले.


राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातल्या राष्ट्रवादी युवा संवाद या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना चक्क पवारांशी अखेरच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ राहण्याची शपथ देण्यात आली. 


या कार्यक्रमाला पार्थ पवार आणि इतर नेते उपस्थित होते. मात्र, अजित पवार यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. आयुष्यभर पक्षाशी एकनिष्ठ राहीन आणि अखेरच्या श्वासापर्यंत शरद पवारांची साथ सोडणार नाही अशी शपथ कार्यकर्त्यांनी घेतली. राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी ही शपथ उपस्थितांना दिली. मात्र, शपथ घेतल्यावर कार्यकर्त्यांची नेत्यांविरोधातली खदखद बाहेर पडली. 


यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी तरुण कार्यकर्त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. आगामी काळात तरुणांना संधी देणे हेच शरद पवार यांचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना इतर नेत्यांची भंबेरी उडताना दिसली. 


गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीतील अनेक मातब्बर नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यापैकी सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तर चित्रा वाघ, शिवेंद्रराजे भोसले, मधुकरराव पिचड, वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर नवी मुंबईतील राजकारणावर पकड असणारे नाईक कुटुंबीयही लवकरच भाजपवासी होण्याच्या मार्गावर आहेत. 


त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईत राष्ट्रवादीपुढे अस्तित्त्वाचे संकट उभे राहिले आहे.