पार्थ पवार लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत- शरद पवार
पार्थ पवार यांनीही आपल्या मावळमधून संधी मिळाल्यास निवडणूक लढवायला आवडेल, असे म्हटले होते.
पुणे: पार्थ पवार हे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे मंगळवारी शरद पवार यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत अजित पवार, पार्थ किंवा रोहित कोणीही लढणार नाही. केवळ मी आणि सुप्रिया ही निवडणूक लढवणार असल्याचे पवार यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पार्थ पवार मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पवार कुटुंबीयांची जनरेशन नेक्स्ट असणारे पार्थ निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची प्रचंड चर्चा होती. अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊन राजकारणात प्रवेश केला होता. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा पार्थ मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. मध्यंतरी मुंबईत झालेल्या बैठकीतही शरद पवार यांनी पार्थ यांच्या नावाला अनुकूलता दर्शविली नव्हती. मात्र, त्यानंतर अजित पवार यांनी अजून बऱ्याच घडामोडी व्हायच्या आहेत, असे वक्तव्य करून आणखीनच संभ्रम निर्माण केला होता. पार्थ पवार यांनीही आपल्या मावळमधून संधी मिळाल्यास निवडणूक लढवायला आवडेल, असे नुकतेच सांगितले होते.
लोकसभा निवडणुकीत युतीला ४५ नव्हे तर ४८ जागा मिळतील; शरद पवारांचा उपरोधिक टोला
मात्र, शरद पवार यांनी आज स्पष्टपणे ते स्वत: आणि सुप्रिया सुळे यांच्याशिवाय पवार घराण्यातील कोणतीही व्यक्ती लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवार माढा तर सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.