अरुण मेहेत्रे, पुणे : पुण्यामध्ये कोरोनाचा विळखा आणखी वाढला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे आठ बळी गेले आहेत. पुण्यात कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन मुंबईप्रमाणेच आता पुण्यातही सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याला अटक केली जाणार आहे.


पुण्यात एका दिवसात बळींची संख्या दुप्पट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात मंगळवारपर्यंत आठ बळी गेले होते. पण बुधवारी हा आकडा १६ वर पोहचला. पुण्यात दिवसभरात मृतांची संख्या दुप्पट झाल्यानं ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे.


पुण्यात आतापर्यंत ससून रुग्णालयात ११, औंध, दीनानाथ रुग्णालय, नायडू, नोबेल, इनामदार रुग्णालयात प्रत्येकी एक अशा एकूण १६ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी ९ ते ११ या दोन तासांत तिघांचा मृत्यू झाला होता. तर गेल्या २४ तासांत आणखी ८ जणांचा मृत्यू झाला. ही आकडेवारी पाहता दोन दिवसांत पुण्यातील मृतांची संख्या झपाट्यानं वाढल्याचं दिसून येत आहे.


 



बारामतीत आणखी दोघांना कोरोनाची लागण


बारामतीमध्ये दोन छोट्या मुलींना कोरोनाची लागण झाली आहे. बारामतीत जो भाजी विक्रेता कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता, त्याच्या दोन्ही नातवंडांना कोरोना झाल्याचं चाचणीत स्पष्ट झालं आहे. या दोन मुलींपैकी एक बालिका एक वर्षाची तर दुसरी आठ वर्षे वयाची आहे. बारामतीत भाजी विक्रेत्याची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांची चाचणी करण्यात आली. त्यात त्याचा मुलगा आणि सून हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर त्यांच्या दोन छोट्या मुलींना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं.  त्यामुळे एकाच घरातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे हा भाजीविक्रेता पुण्याला जाऊन आल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळला. याव्यतिरिक्त त्याचा प्रवासाचा इतिहास नाही. या आधी बारामतीतील एका रिक्षाचालकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे बारामतीत कोरोना बाधितांची संख्या आता ६ झाली आहे.