पुणे: अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या संजीव पुनाळेकर यांच्याविरुद्ध माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. श्रीपाल सबनीस यांनी २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी संजीव पुनाळेकर यांनी श्रीपाल सबनीस यांना ‘मॉर्निग वॉकला जात चला’, असा सल्ला दिला होता. यावरून मोठा वाद झाला होता. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांची हत्या ते सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडल्यानंतरच झाली होती. त्यामुळे पुनाळेकर यांच्या वक्तव्याला धमकीचा संदर्भ असल्याचा सबनीस यांचा आरोप आहे. परिणामी या वक्तव्याची पुन्हा चौकशी व्हावी, अशी मागणी श्रीपाल सबनीस यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने शनिवारी दुपारी डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात संजीव पुनाळेकर आणि २००८ च्या गडकरी रंगायतन स्फोटातील दोषी विक्रम भावे यांना अटक केली होती. या दोघांनाही रविवारी पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्याची विनंती केली. मात्र, त्याला नकार दिल्यामुळे पोलीस आणि सनातनच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर संजीव पुनाळेकर यांनी स्वत: आपली बाजू मांडली. 


दाभोलकरांवर हल्ला करणाऱ्या दोन्ही हल्लेखोरांच्या पुनाळेकर आणि भावे संपर्कात होते. दाभोलकरांवर हल्ला करणाऱ्या आणि सध्या अटकेत असलेल्या शरद कसाळकर याला हल्ल्यात वापरलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला पुनाळेकरांनी दिल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली, अशी माहिती 'सीबीआय'च्या सूत्रांनी दिली.