दिवाळी २०१७ : दिवाळीतील या ५ दिवसांचे महत्व
गणेशोत्सवानंतर वेध लागतात ते दिवाळीचे.... वर्षाच्या अखेरीस सर्वात मोठा येणारा सण म्हणजे दिवाळी. लखलख दिव्यांच्या प्रकाशात हा उत्सव साजरा केला जातो. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण.
मुंबई : गणेशोत्सवानंतर वेध लागतात ते दिवाळीचे.... वर्षाच्या अखेरीस सर्वात मोठा येणारा सण म्हणजे दिवाळी. लखलख दिव्यांच्या प्रकाशात हा उत्सव साजरा केला जातो. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण.
अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा सण. निराशेतून आशेचं किरण दाखवणारा हा सण सगळीकजेच उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी हा सणच जणऊ उत्साह घेऊन येत असतो. अगदी घरातील साफ-सफाईपासून ते रंगकामापर्यंत साऱ्याच गोष्टी एक वेगळाच उत्साह घेऊन येतो. दिवाळीचा हा उत्साह पाच दिवसांचा असतो. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या पाच दिवसाच्या सणांनी हा उत्सव भरलेला असतो. सगळीकडे रंगाची आणि दिव्यांची रोशनाई असते. आतिषबाजी, फटाक्यांसोबत फराळाचा आस्वाद घ्यायचा असतो. याच सणाचं महत्वं जाणून घेऊया....
वसुबारस
‘वसू’ या शब्दाचा एक अर्थ धन असा होतो, वसुधा म्हणजे पृथ्वी म्हणजे जमीन म्हणजे एका अर्थाने दौलतच. या जमिनीतून धान्यरूपी धन प्राप्त होतं आणि ‘बारस’ हा शब्द द्वादशी या तिथीसाठी ग्रामीण भागात सर्रास वापरतात. बारस या शब्दात ‘पाडस’ किंवा ‘वासरू’ शब्दाची किंचितसी छटा आहे. ‘वसुबारस’ म्हणजे सवत्सधेनु (गाय आणि वासरू) यांची पूजा करण्याचा दिवस. या दिवशी गावाकडे गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतात. वरील गाण्यात गाई-बैलाच्या रक्षणासाठी वाघाशी पंगा घेण्याची देखील तयारी दाखवली आहे ती गोधनाच्या कृतज्ञतेपोटीच.! दुधदुभत्यासाठी होणारा गायीचा उपयोग व शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत या गोष्टी लक्षात घेऊन त्या गोधनाची कृतज्ञता पूजा. गोठय़ातील गोधन, म्हशी आणि बैल, शेळ्या-मेंढय़ा हीच शेतकऱ्याची खरी धनदौलत. या गोधनाची कृतज्ञता पूजा म्हणजे वसूबारस. दक्षिण कोकणात या दिवशी गोठय़ात शेणाच्या गवळणी व श्रीकृष्णाच्या मूर्ती बनवल्या जातात. त्यांची पूजा केली जाते. विशेष म्हणजे या दिवशी घरातल्या स्त्रियांना गोठय़ातलं कोणतंही काम करण्याची परवानगी नसते. ही आपल्या ‘कृषीसंस्कृती’ने आपल्याच मूळ ‘मातृप्रधान संस्कृती’ला दिलेली मानवंदना आहे. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला व त्याची कृतज्ञता म्हणून असे केले जात असावे हे निश्चित.
धनत्रयोदशी
शेतकऱ्यांच्या दृष्टीने खळ्यात लागलेल्या नवीन धान्याच्या राशी हेच त्यांचे धन.! ‘धान्य’ हा शब्द धन या शब्दातूनच उत्पन्न झाला असावा अशी कल्पना केल्यास ती चुकीची ठरू नये. ‘धन’रूपी ‘धान्य’ घरात आलेलं असतं. या नवीन नवीन धान्याची पूजा करण्याचा दिवस ती धनत्रयोदशी. शहरात आपण या दिवशी पाटावर लक्ष्मीची मूर्ती, घरातील सोनं-नाणं यांची पूजा करतो. नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद यालाही फार मोठे महत्त्व आहे. शहरात गुजराती-मारवाडय़ाच्या सहवासाने या दिवसाला सर्रास ‘धनतेरस’ असं म्हणू लागलेत अलीकडे.!! आयुर्वेदाचा उद्गाता धन्वंतरी याचा जन्मही याच दिवशी झाल्याची कथा आहे. म्हणून वैद्यजन या दिवशी धन्वंतरीची जयंती साजरी करतात.
‘नरकचतुर्दशी’
आपल्यासारख्या चाकरमान्यांच्या दृष्टीने हा दिवाळीचा पहिला दिवस. बहुजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महाजनांच्या ‘अभ्यंगस्नाना’चा हा दिवस. नरकासुर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला ‘नरकचतुर्दशी’ असे नाव पडले असा पुराणांमध्ये उल्लेख आहे. कोकणातल्या ग्रामीण भागात या दिवशी नवीन भातापासून तयार केलेल्या पोह्य़ांचे विविध पदार्थ बनवण्याचा रिवाज आहे. तर शहरात फराळाच्या विविध प्रकारात झाले. शहरात या दिवशी सुगंधी उटणे, सुवासाचा साबण लावून आंघोळ करतात. देवळात जाऊन देवदर्शन करून आल्यावर एकत्र बसून फराळ करतात. हा दिवस येणाऱ्या व जाणाऱ्या विक्रमसंवताचा संधीकालातला दिवस. सरते वर्ष भरभराटीचं, समृद्धीचं गेलं त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याची कृषीसंस्कृतीची ही प्रथा होती. कृष्ण व नरकासुराच्या कथेचा साज त्यास खूप नंतर चढवण्यात आला असावा.
लक्ष्मीपूजन
अश्विन वद्य अमावास्या म्हणजेच ‘लक्ष्मीपूजना’चा दिवस. गावाकडे या दिवशी गोठय़ातील गो-धनाची, शेळ्या-मेंढय़ांची पूजा केली जाते. तर शहरात लक्ष्मी म्हणजे पैसा-सोनं-नाणं हेच असल्याने त्यांची पूजा करतात. व्यापारीजन त्यांच्या चोपडय़ांचे पूजन या दिवशी करतात. या दिवशी बळी पाताळात गाडला गेला, सर्व देवतांची सुटका झाली व लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित झाले याची आठवण म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजन करतात. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंगस्नान करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. आणखी एक प्रथा गावाकडे आणि शहरातही आवर्जून पाळली जाते ती म्हणजे या दिवशी घरी-दारी-गोठय़ात स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी झाडू विकत घेतात. झाडूला साक्षात लक्ष्मी मानून, तिच्यावर पाणी शिंपडून, तिला सवाष्ण लक्ष्मी मानून तिची हळद-कुंकू वाहून मनोभावे पूजा करतात व नंतरच घरात वापरण्यास सुरुवात करतात. स्वच्छतेच्या ठिकाणीच लक्ष्मीचा वास असतो ही श्रद्धा या प्रथेमागे असते.
दीपावली पाडवा
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा. प्रतिपदा या शब्दाचं गावरान बोलीतलं स्वरूप म्हणजे ‘पाडवा’ हा शब्द! ग्रामीण भागात या दिवसाला ‘बलिप्रतिपदा’ म्हणतात. शेतकऱ्यांचा लोककल्याणकारी आद्य राजा बळी याचं स्मरण करण्याचा दिवाळीतील हा सर्वाधिक महत्त्वाचा दिवस. याच दिवशी वामनाने बळीला पृथ्वीवरून पाताळात ढकलले अशी पुराणकथा आहे. खरंतर ते एक रूपक असावं. खरी गोष्ट, या देशातील मूळ शेतीसंस्कृती व नंतरच्या काळात उदयाला आलेल्या इतर संस्कृतींमधील झगडय़ात, शेतकऱ्याला व शेतीला दुय्यम स्थान मिळण्यास सुरुवात झाली, ही आहे. समाजव्यवस्थेच्या शीर्षस्थानी असणारा शेतकरी नंतरच्या काळात दुय्यम (पाताळ) स्थानी ढकलला गेला, त्याची सुरुवात या दिवशी झाली असावी असा अर्थ यातून काढला जाऊ शकतो. ‘दिन दिन दिवाळी..’ या लोकगीतातली शेवटची ओळ, ‘इडा-पिडा टळो, बळीचं राज्य येवो’ अशी आहे व याचा अर्थ स्पष्ट आहे. ‘इडा (इला)’ म्हणजे जमीन आणि बळी म्हणजे शेतकरी. जमिनीला आपल्या संस्कृतीत अन्नदेवता म्हटलंय. जमिनीवरील संकट टळून बळी म्हणजे शेतकरी राजा झाल्याशिवाय हा देश समृद्ध होणार नाही हाच संदेश यातून दिला जातो. सध्या झालेल्या शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीवरून याची जाणीव आणखी तीव्र होते. वामनाने जरी बळीला पाताळात ढकललं असलं तरी हा देश व या देशातील शेतकरी हजारो वर्षे उलटूनही बळीला अद्याप विसरलेला नाही हेच यातून सिद्ध होतं. या दिवशी विक्रमसंवत सुरू होतं. शहरी व्यापाऱ्यांचं किंवा उत्तर भारतातल्या लोकांचं नवं वर्ष या दिवशी सुरू होतं. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या, कीर्द-खतावणीच्या चोपडय़ा या दिवशी नवीन हिशोबासाठी सज्ज होतात. पाडवा हा साडेतीन मुहुर्तामधला ‘अर्धा’ शुभमुहूर्त आहे. शहराकडे या दिवशी बायकोने नवऱ्याला ओवाळायची प्रथा काही समाजात आहे.
भाऊबीज
कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवाळते. जर काही कारणाने बहिणीच्या घरी भाऊ जाऊ शकला नाही अथवा तिला भाऊच नसला तर ती चंद्राला भाऊ समजून ओवाळते. इथे मला नागपंचमीची आठवण होते. आपल्या संस्कृतीत बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी नागपंचमीचा उपवास करते. हिंदू संस्कृतीत नागाला भाऊ मानलं गेलं आहे. चंद्र व नाग दोन्ही शेतीसाठी उपयुक्त आहेत. भाऊबीज साजरी करण्यामागे शेती संस्कृतीत हाच उद्देश आहे. शेतीसाठी उपकारक असणाऱ्या चंद्राचे औक्षण बहीणरूपी धरती करते हा अर्थ भाऊबीजेचा आहे.