उत्तर प्रदेश : राम जन्मभूमी अयोध्यामध्ये मोठ्या उत्साहात दिपावलीचा उत्सव साजरा करण्यात आला. स्वतः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यासाठी अयोध्येमध्ये दाखल झाले होते. यावेळी खास हेलिकॉप्टररुपी पुष्पक विमानाने श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचं अयोध्येमध्ये आगमन झाले. स्वतः योगी आदित्यनाथ यांनी पुष्पहार अर्पण करुन या तिघांचं स्वागत केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


लंकाविजयानंतर राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येला परतले होते, तेव्हा ते शरयू नदी किना-यावरुनच अयोध्येत दाखल झाले होते. अयोध्येत त्यांचं आगमन झाल्यानिमित्तानं त्यावेळी अयोध्यावासीयांनी दीपावली उत्सव साजरा केला होता. त्याचंच औचित्य साधत शरयू नदीचा किनारा लाखो दिव्यांनी उजळवण्यात आला. या खास सोहळ्याला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत, राज्यपाल राम नाईक आणि इतरही मान्यवर उपस्थित होते. या निमित्तानं योगी आदित्यनाथ यांनी शरयू नदीची विधीवत आरतीही केली. 
यावेळी लेझर शोचंही आयोजन करण्यात आले होते. धार्मिक पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न याद्वारे केला जात असल्याचं, पर्यटन आणि माहिती विभागाच्या प्रधान सचिवांनी यावेळी सांगितलं. त्याचाच भाग म्हणून श्रीरामाशी संबंधित विविध पौराणिक स्थळांनाही प्रकाशमय केलं जाणार आहे.
दरम्यान प्रत्येकाला त्याच्या हक्काचं छत मिळवून देणं, रोजगार पुरवणं, हेच खरं रामराज्य असून, भाजप सरकार त्यासाठी कटीबद्ध असल्याचं, यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.