Shrawan 2021 | पहिला श्रावणी सोमवार; कशी कराल पूजा?
श्रावण महिन्याची सुरूवात सोमवारी होते आणि शेवट देखील सोमवारी होतो.
मुंबई : आजपासून श्रावण महिन्याला सुरूवात होत आहे. श्रावण महिना म्हटलं की सर्वत्र उत्साहाचं वातावरण. श्रावणाला व्रतवैकल्यांचा महिना म्हटला जातो. हा महिना शिवपूजनासाठी अत्ंयत महत्त्वाचा आहे. या महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते. शंकराला पाण्याचा आणि दुधाचा अभिषेक केला जातो. महत्त्वाचं म्हणजे श्रावण महिन्याची सुरूवात सोमवारी होते आणि शेवट देखील सोमवारी होतो. 9 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरु होणार असून 6 सप्टेंबर रोजी श्रावण महिना संपेल. असं म्हणतात पार्वती देवीने शंकराला प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते.
आज अनेक शिवभक्त भगवान शंकराची पूजा करतील. पहिल्या सोमवारी तांदूळ (Rice) शिवामूठ (Shivamuth) म्हणून वाहण्याची परंपरा आहे. शिवपूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेकालाही विशेष महत्व असते. सध्या या धावपळीच्या विश्वात वेळ नसेल तर फक्त एक बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पूजा पूर्ण झाल्याचे म्हटले जाते.
श्रावण महिन्यात सोमवारी उपवास केला जातो आणि दुवऱ्या दिवशी उपवास सोडतात. श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर शिवशंकराचे ध्यान करावे. जर तुम्हाला शक्य असेल तर घरानजीकच्या एका उद्यानात थोडा वेळ जाऊन यावे.
महत्त्वाचं म्हणजे सोमवारी उपवास ठेवून भगवान शंकराची पूजा केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण कराल. आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतात. भगवान शंकर आणि माता पार्वतीची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात असे देखील म्हटले जाते.