मुंबई : आज गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुचा नाही, तर शिष्याचा दिवस. आजच्या दिवसाचे महत्त्व फार मोठे आहे. आजच्या दिवशी प्रत्येक शिष्य आपल्या गुरुंचे आशीर्वाद घेतो. ही परंपरा गेल्या अनेक दशकांपासून सुरु आहे. आजही ही परंपरा आजची पिढी तितक्याचं आवडीने जपत आहे. या दिवशी लक्ष्मीनारायण यांचे व्रत केले जाते. याशिवाय धार्मिक मान्यतेनुसार महर्षी वेद व्यास यांचा जन्म आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता म्हणून या दिवसाला गुरु पौर्णिमा म्हणतात. महर्षी वेद व्यास हे 18 पुराणांचे लेखक आहेत आणि वेदांच्या विभागणीचे श्रेयही त्यांना जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरु पौर्णिमा 2022 शुभ मुहूर्त
हिंदू कॅलेंडरनुसार, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा आज आहे. पौर्णिमा तिथी 13 जुलै रोजी पहाटे 4 वाजता सुरू होईल आणि 14 जुलै रोजी दुपारी 12.06 वाजता समाप्त होईल. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटेपासून इंद्र योग तयार होत असून तो दुपारी 12.45 पर्यंत राहील. तर पूर्वाषाधा नक्षत्र रात्री 11.18 पर्यंत राहील. हे दोन्ही योग शुभ कार्यासाठी अतिशय लाभदायक आहेत.


गुरु पौर्णिमा व्रत कथा
आषाढ महिन्यातील पौर्णिमेला उपवास करण्याचेही विशेष महत्त्व असून हे व्रत कथेशिवाय पूर्ण होत नाही असे म्हटले जाते. जे व्रत करतात त्यांनी या दिवशी कथा जरूर वाचावी आणि ऐकावी. असे म्हटले जाते की महर्षी वेद व्यासांनी लहानपणीच आपल्या आई-वडिलांकडून परमेश्वराचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु आई सत्यवती यांनी वेद व्यासांची इच्छा धुडकावून लावली.


तेव्हा वेद व्यास हट्ट करू लागले आणि त्यांच्या हट्टीपणावर आईने त्यांना जंगलात जाण्याची आज्ञा केली. घरची आठवण आली की परत या असेही त्यांना सांगितले. यानंतर वेद व्यास तपश्चर्येसाठी वनात गेले आणि वनात गेल्यावर त्यांनी कठोर तपश्चर्या केली. 


या तपश्चर्येमुळे वेद व्यासांना संस्कृत भाषेवर प्रभुत्व प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी चार वेदांचा विस्तार केला आणि अठरा महापुराणांसह महाभारत, ब्रह्मसूत्र रचले. महर्षी वेदव्यास यांना चारही वेदांचे ज्ञान होते. त्यामुळेच या दिवशी गुरूची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके सुरू आहे.


(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही)