Jeshtha Gauri Pujan 2022: पहिल्यांदाच करताय गौराईंचं पूजन? नव्या नवरीनं घ्या `ही` काळजी
जर तुम्ही पहिल्यांदाच गौराईंचं पूजन (Jyeshtha Gauri Pujan 2022 ) करणार असणार तर नव्या नवरीने काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
Jyeshtha Gauri Pujan 2022: देशभरात गणशोत्सव मोठ्या थाट्यामाट्यात साजरा करण्यात येतो आहे. राज्यात अनेक घरात शनिवारी गौराईचं आगमन झालं. राज्यभरात सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. राज्यातील विविध भागात गौराई आणि विदर्भ, मराठवाड्यातील महालक्ष्मांची आज मनोभावे पूजाअर्चा करण्यात येणार आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच गौराईंचं पूजन (Jyeshtha Gauri Pujan 2022 ) करणार असणार तर नव्या नवरीने काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. शिवाय पूजेसाठी शुभ मुहूर्त कुठला आहे तेही आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
'ओवसं' सुवासिनींसाठी आहे खास
राज्यातील काही भागात खास करुन कोकणात नवीन नवरीसाठी गौराईंचं पूजन खूप खास असतं. कारण ज्येष्ठा गौरी पूजेच्या निमित्ताने ज्येष्ठ नक्षत्राला 'ओवसं' भरण्याची पद्धत कोकणासह कोल्हापूर आणि अन्य काही भागात प्रसिद्ध आहे. (Jyeshtha Gauri Pujan 2022 what is ovas and how is it celebrated by married womens)
गौरी पूजन साहित्य
ओवसं सूप विषयी राज्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आहेत. कोकणात एका सुपात 5 प्रकारच्या भाज्या, 5 प्रकारच्या वेलींची पाने, 5 प्रकारची फळे, करंडा फणी, ओटी (खण आणि नारळ) फुलं (भेंडींची असल्यास उत्तम) आणि पानावर सुटे पैसे ठेवले जातात. तसंच सूपाला हळद कुंकू लावलेले दोरे गुंडाळले जातात. तर आगरी कोळी समाजात नव्या नवरीसाठी सौभाग्यलेणी, साडी-चोळी आणि गोड पदार्थ भरलेले सूप तिच्या आईकडून पाठवण्यात येते. याशिवाय कोल्हापुरातही हा सण मोठ्या उत्साहात पार पडतो. सुपाला दोर्याच्या गुंड्या गुंडाळून, त्यात ओवश्याचं सर्व सामान ठेवतात. गौरीसहित घरामध्ये जितक्या सुवासिनी असतील, त्यासाठी प्रत्येकी पाच विडे तयार केले जातात आणि ते वाटले जातात.
ओवश्याची 5 सुपं भरण्याचं कारण
एरवी घरातील स्त्रिया प्रत्येकी एक सूप घेतात. पण नवविवाहितेने पाच सुपं घेण्याची पद्धत आहे. पहिल्या वर्षी एक सूप माहेरी, एक सासरी, एक नवर्याला आणि नात्यातीलच कोणाला उरलेला ओवसा दिला जातो. हे वाण दिल्यावर ते पैसे देतात. नंतरच्या वर्षी फक्त गौरीला ओवसा दाखवला जातो.
ज्येष्ठा गौरी पूजन
गौराईच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी गौरी पूजन करण्याची परंपरा आहे. यादिवशी सकाळी गौरींची पूजा आरती करून बनवलेले फराळ जसे की रव्याचे लाडू, शंकरपाळ्या, शेव, करंजी, चकली इ. नैवेद्य दाखवावा. दुपारी पूरण पोळी, सोळा भाज्या एकत्र करून भाजी, देव फळ, आंबड्याची भाजी, कडी, शेंगदाण्याची चटणी, डाळीची चटणी, पापड, भजी, इ. बनवून नैवेद्य दाखवा. तर कोकणात कोंबडी वडेचा नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे.
सायंकाळी हळदी,कुंकाचा कार्यक्रम ठेवावा. महाराष्ट्रातील अनेक भागात गौरी पूजनाच्या दिवशी नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना जेवण्यासाठी बोलवण्याची परंपरा आहे.
पूजनाचा शुभ मुहूर्त
ज्येष्ठा गौरी पूजन – 4 सप्टेंबर 2022, रविवार
पूजन मुहूर्त : सकाळी 06.00 वाजेपासून सायंकाळी 06:39 वाजेपर्यंत
गौरीचा आवडता नैवेद्य
आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, गणपतीला सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक. म्हणून गणपतीच्या नैवेद्यात मोदकाला विशेष महत्त्व आहे. तसंच तुम्हाला गौराईचा आवडता नैवेद्य कुठला, हे माहती आहे का? राज्यात गौराईची पूजा वेगवेगळ्या भागात भिन्न आहे. पण गौराईंचा आवडता नैवेद्य हा जवळपास सगळीकडे सारखा आहे. नवीन नवरीने गौराईच्या पूजनाच्यावेळी हा नैवेद्य नक्की करावा.
कथली म्हणजे कढी:
गौरी म्हणजेच महालक्ष्मीच्या या नैवेद्यात हरसुलं आणि पडवळ यांचं महत्त्व असतं. यापासून कढी यालाच कथली असं म्हणतात. गौरींच्या नैवेद्यात कथलीचं महत्त्व आहे.
ज्वारीची आंबिल:
गौरीचा सर्वात आवडता पदार्थ जो प्रत्येकाच्या घरी नैवेद्याला केलाच जातो. तो म्हणजे आंबिल. आंबिल ही ज्वारीची बनवली जाते. काही ठिकाणी फोडणीची आंबिल बनवतात. तर काही ठिकाणी साधी (पांढरी) आंबिल बनवतात.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)