Rishi Panchami Special Bhaji Recipe: गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज 20 सप्टेंबर रोजी ऋषीपंचमी साजरी केली जाते. यादिवशी महिला ऋषीपंचमीचे व्रत करतात. ऋषीपंचमीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. यादिवशी खास पद्धतीने भाजी बनवली जाते. या भाजीला ऋषीची भाजी असं म्हणतात. तब्बल 21 भाज्या वापरून व तेलाचा एक थेंबही न वापरता ऋषीची भाजी केली जाते. पण हल्ली काळाच्या ओघात मात्र ही भाजी फारशी कुठे केली जात नाही. हल्ली ऋषीच्या भाजीसाठी वापरण्यात येणाऱ्या भाज्याही शहरात फारशा मिळत नाहीत. त्यामुळं फक्त 11 भाज्या वापरुनही तुम्ही ही भाजी करु शकतात. तेल न वापरताही ही भाजी कशी करायची याची खास रेसिपी जाणून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषीपंचमीच्या व्रतासह त्याच्या उपवासालाही अधिक महत्त्व आहे. या दिवशी या दिवशी बैलाच्या कष्टांचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. ऋषिपंचमीला व्रताहारामध्ये केवळ मानवी कष्टातून उत्पन्न झालेले म्हणजेच न नांगरलेल्या जमिनीतील पदार्थांचे सेवन करावे असं शास्त्रात सांगितलं आहे


ऋषीपंचमीची भाजी कशी करावी?


साहित्य 


भाज्या
अळूची पाने, सुरण, वाल, लाल भोपळा, मटार, भेंडी, पडवळ, शिराळं, मक्याचे कणिस, काकडी, कोवळा माठ (भाजी) या भाज्या बारीक चिरुन घ्यावात.


सात-आठ मिरच्या, थोडा चिंचेचा कोळ, दोन वाट्या खवलेलं खोबरं, चवीपुरतं मीठ


कृती


सर्वप्रथम सर्व भाज्या एका ताटात एकत्र करा त्यानंतर मिरचीचा ठेचा करुन भाज्यांना लावून घ्या. नंतर भाज्यांना मीठ लावून व्यवस्थित मिक्स करुन घ्या. 


भाज्या व्यवस्थित मिक्स करुन घेतल्यानंतर गॅसवर एक जाड पातेले ठेवा. त्यानंतर तेल न वापरता भाज्या थेट भांड्यात शिजायला टाका. अधे मधे भाज्या परतत राहा. 


ऋषीच्या भाजीसाठी लागणाऱ्या बहुतेक भाज्या या रसभाज्या असतात त्यामुळं त्यांना पाणी सुटते व भाजी चिकटतही नाही. तसंच, भाजीला आधीच मीठ लावून घेतल्याने जास्त पाणी घालण्याचीही आवश्यकता नाही. आवश्यकता असेल तरच पाणी घाला. 


भाजी थोडी शिजत आली की त्यात चिंचेचा कोळ घाला आणि संपूर्ण भाजी शिजली की वरुन खोबरं टाकून ढवळा. ऋषीची भाजी तयार


ऋषीची भाजी गरमागरम बाजरी, ज्वारी, तांदळाची भाकरीसोबत खाल्ल्यास छान लागते.