51 शक्तीपीठांपैकी 9 शक्तीपीठे परदेशात, पाकिस्तानसह `या` देशात होतो देवीचा जागर
Shaktipeeths outside India: नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या विविध रुपांची पूजा केली जाते. या दिवसात आपण देवी सतीच्या 51 शक्तीपीठांबाबत जाणून घेऊया.
Shaktipeeths outside India: सती ही महादेवाची पहिली पत्नी आणि राजा दक्ष यांची कन्या राजा. राजा दक्षाने आदिशक्ती भगवतीला प्रसन्न करण्यासाठी तप केला. तेव्हा देवीने मी तुझ्या घरी स्वतः तुझी पुत्री बनून येईल, असं वरदान दिले. त्याचबरोबर जेव्हा तुझा माझ्याप्रती असलेल्या आदर कमी होईल तेव्हा या शरीराचा त्याग करेन, असंही म्हटलं होतं. देवीच्या वरदानानुसार प्रजापती दक्षाच्या घरी एका मुलीने जन्म घेतला तिचे नाव सती ठेवले गेले. पुढे देवीसतीने घोर तपस्या करत भगवान महादेवाला प्रसन्न केले आणि पती म्हणून मिळवले. मात्र, प्रजापती दक्षकडून एका यज्ञाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आपल्या पतीचा माहेरकडूनच झालेला अपमान सहन न होऊन देवी सतीने अग्नीकुंडात उडी घेतली.
महादेवाला हे समजताच ते अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी देवी सतीचे शरीर उचलून तांडवनृत्य करण्यास सुरुवात केली. हा प्रकार जर कोणी रोखला नाही तर संपूर्ण सृष्टी उद्ध्वस्त होईल, म्हणून विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शनचक्र सतीच्या पार्थिवाकडे फेकले, सुदर्शनचक्राने सतीचे 51 तुकडे झाले आणि संपूर्ण पृथ्वीवर पसरले. आज शक्तीपीठ म्हणून ओळखले जातात. भारतात 42 शक्तीपीठे आहेत तर, भारताच्या शेजारील 5 देशात 10 शक्तीपीठांची पूजा केली जाते. भारताबाहेर देवी सतीची शक्तीपीठे कुठे आहेत याचा आढावा घेऊयात.
बांगलादेश येथे देवीचे पाच शक्तीपीठे आहेत.
सुगंधा शक्तीपीठ
हे शक्तीपीठ सुनंदा नदीच्या तिरावर आहे. येथे देवीचे नाक पडले होतो, अशी मान्यता आहे. माता सती देवी सुगंधाच्या रुपात शिव त्र्यंबकसोबत वास करते, असं म्हटलं जाते.
चट्टल भवानी
हे शक्तीपीठ चितगाव जिल्ह्यातील सीता कुंड स्थानकाजवळ चंद्रनाथ पर्वत शिखरावरील छत्राल येथे आहे. येथे माता सतीचा उजवा हात पडला असल्याची मान्यता आहे. येथे देवीच्या भवानी रूपाची पूजा केली जाते.
श्रीशैल महालक्ष्मी
हे शक्तीपीठ सिल्हेट जिल्ह्यातील शैल नावाच्या ठिकाणी आहे. येथे माता सतीची मान पडली असल्याचे म्हटले जाते. येथे मातेच्या महालक्ष्मी रूपाची पूजा केली जाते.
यशोरेश्वरी माता शक्तिपीठ
खुलना जिल्ह्यात यशोरेश्वरी मातेचे शक्तिपीठ आहे. या ठिकाणी देवीचा डावा तळहाता पडला होता, अशी मान्यता आहे.
अपर्णा शक्तिपीठ
हे शक्तिपीठ बांगलादेशातील भवानीपूर गावात आहे. येथे माता सतीच्या डाव्या पायाचे पैंजण पडले होते.
नेपाळमध्ये दोन शक्तीपीठ
गुहेश्वरी शक्तिपीठ
हे शक्तिपीठ पशुपतीनाथ मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या बागमती नदीच्या काठावर आहे. इकडे देवीचे दोन्ही गुडघे पडले. येथे देवीची महामाया आणि भगवान शिवाच्या भैरव कपाल रूपाची पूजा केली जाते.
आद्या शक्तिपीठ
गंडक नदीजवळ आद्य शक्तीपीठ आहे. येथे माता सतीचा डावा गाल पडला होता असे मानले जाते. येथे मातेची गंडकी रूपाची पूजा केली जाते.
हिंगुला शक्तिपीठ, पाकिस्तान
हिंगुला शक्तीपीठ पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये आहे. येथे हिंगलाज देवीची पूजा केली जाते. येथे माता सतीचे मस्तक पडले होते. या प्रसिद्ध शक्तीपीठाला नानीचे मंदिर किंवा नानीचा हज असेही म्हणतात.
मनसा शक्तिपीठ, तिबेट
मनसा देवी शक्तीपीठ तिबेटमधील मानसरोवर नदीच्या काठावर आहे. माता सतीचा उजवा तळहात येथे पडला होता असे मानले जाते.
इंद्राक्षी शक्तिपीठ, श्रीलंका
श्रीलंकेत देवी सतीचे प्रसिद्ध इंद्राक्षी शक्तीपीठ आहे. या ठिकाणी देवी सतीच्या पायाचा घोटा पडला होता. जाफना नल्लूरमध्ये आईला इंद्राक्षी म्हणतात.