12 जुलैपासून शनिदेव होणार वक्री, 189 दिवस `या` राशींना करावा लागेल अडचणींचा सामना
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी बदल करतो. यात शनि, राहु-केतु आणि मंगळ या ग्रहांच्या राशी बदलांना विशेष महत्त्व आहे.
मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी बदल करतो. यात शनि, राहु-केतु आणि मंगळ या ग्रहांच्या राशी बदलांना विशेष महत्त्व आहे. शनि अडीच वर्षांनी, तर राहु-केतु दीड वर्षांनंतर राशी बदल करतात. त्यामुळे अनेकदा एकाच राशीत एकापेक्षा अधिक ग्रह येतात आणि काही योग तयार होतात. 29 एप्रिलला न्यायदेवता शनिदेवांनी स्वत:च्या कुंभ राशीत प्रवेश केला आहे. मात्र आता 12 जुलैपासून शनिदेव वक्री होणार असल्याने हा काळ काही राशींना शुभ, तर राशींना अशुभ ठरणार आहे. वक्री म्हणजे पुन्हा एकदा मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींची साडेसाती आणि अडीचकीपासून मुक्तता, तर काही राशींना साडेसाती आणि अडीचकीचा सामना करावा लागणार आहे. कोणत्या राशी शनिच्या प्रभावाखाली येणार आहेत, जाणून घेऊयात.
शनि साडेसाती आणि अडीचकी
शनि साडेसाती साडे सात वर्षे तर अडीचकी अडीच वर्षांसाठी असते. शनिदेवांना एखाद्या राशीत प्रवेश केल्यानंतर त्या राशीच्या मागच्या आणि पुढच्या राशीला साडेसाती असते. आता शनि ग्रह कुंभ राशीत आहे. त्यामुळे मकर राशीला शेवटची अडीच वर्षे, तर मीन राशीला पहिली अडीच वर्षे सुरु आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार 29 एप्रिलला कुंभ राशीत प्रवेश केला आहे. मात्र 12 जुलैला शनि वक्री होणार आहे म्हणजेच मकर राशीत प्रवेश करणार आहे.
शनिदेवांनी मकर राशीत प्रवेश करताच धनु राशीला साडेसाती सुरु होणार आहे. तर मीन राशीला साडेसातीपासून तात्पुरता दिलासा मिळणार आहे. हा दिलासा 17 जानेवारी 2023 पर्यंत म्हणजेच 189 दिवस असणार आहे. त्यानंतर शनिदेव मार्गस्थ होतील आणि धनु राशीची साडेसातीपासून मुक्तता होईल.
शनिदेव कुंभ राशीत असल्याने कर्क आणि वृश्चिक राशीला अडीचकी सुरु आहे. मात्र शनि वक्री झाल्यानंतर तूळ आणि मिथुन राशीला पुन्हा एकदा अडीचकी सुरु होणार आहे. हा प्रभाव 17 जानेवारी 2023 पर्यंत असणार आहे. त्यानंतर कर्क आणि वृश्चिक राशीला पुन्हा अडीचकी सुरु होईल.
वैयक्तिक कुंडलीत शनिदेव शुभ स्थितीत असल्यास या काळात मनुष्याला जास्त अडणींचा सामना करावा लागत नाही. पण शनि अशुभ स्थितीत असेल तर हा काळ अडचणीचा जातो. कामं वेळेत होत नाहीत. मेहनत करूनही पूर्ण फळ मिळत नाही.