Vat Purnima 2023:  भारतामध्ये अनेक महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म त्याचीच साथ मिळावी यासाठी वट पौर्णिमेचा उपवास आणि वडाची पूजा करतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण देशभरात काही ठिकाणी 15 दिवसांच्या अंतरानं हा उपवास ठेवला जाते. पहिला म्हणजे ज्येष्ठातील अमावस्येला आणि दुसरा म्हणजे पौर्णिमेला. दोन्हीही वेळांना ठेवल्या जाणाऱ्या उपवासाचं महत्त्वं आणि त्यांचा पूजाविधी जवळपास एकसारखाच आहे. संतानप्राप्ती आणि सौभ्याग्याचं रक्षण करण्यासाठी, संसारारून वाईट सावट दूर करण्यासाठी महिला हा उपवास, हे व्रत करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या वर्षी 3 जून 2023, शनिवार (आज) वट पौर्णिमा / ज्येष्ठ पौर्णिमेचा (Jyeshta Purnima 2023 ) योग जुळून आला आहे. या दिवशी विवाहित महिला साजशृंगार करून वडाची पूजा करतील. काहीजणी उपवास ठेवतील, तर काही फक्त पूजा करतील. शास्त्रांमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार या दिवशी वडाचीच नव्हे, तर आणखी दोन वृक्षांची म्हणजेच एकूण तीन वृक्षांची पूजा केली जाते.


तुम्हाला माहितीयेत का हे वृक्ष? 


तुळस - ज्येष्ठ पौर्णिमेला तुळशीच्या रोपाच्या मुळाशी असणारी माती घेऊन त्या मातीचाच टीळा माथी लावण्याचा सल्ला दिला जातो. असं म्हणतात की, असं केल्यामुळं तुम्ही जे कार्य हाती घेता त्यात यश संपादन करतात. खुद्द विष्णू तुमच्यावर प्रसन्न होऊन सर्व इच्छा, आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण करण्याचा आशीर्वाद देतात. या दिवशी तुळशीला लाल वस्त्र अर्पण करावं, यामुळं दुर्भाग्याचा नायनाट होतो. 


हेसुद्धा वाचा : Vat Purnima 2023 : यंदाच्या वट पौर्णिमेवर भद्राचं सावट; पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजा कधी आणि कशी करावी?


 


वड- ज्येष्ठ पौर्णिमा किंवा वट पौर्णिमेला विवाहित महिला वडाच्या वृक्षाची पूजा करतात. असं म्हणतात की या वृक्षामध्ये त्रिदेवाचा वास आहे. या वृक्षाला 108 वेळा कच्चं सूत/ धागा बांधून त्याला परिक्रमा मारावी. असं केल्यानं ब्रह्म, विष्णू आणि महेश या देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि महिलांचं सौभाग्य अखंड राहतं. 


पिंपळ - शास्त्रांमध्ये नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार ज्येष्ठ पौर्णिमेला सकाळच्या वेळी पिंपळाच्या वृक्षामध्ये खुद्द देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळं या वृक्षाला दूध, जल अर्पण केल्यास महालक्ष्मी प्रसन्न होऊन साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा आशीर्वाद देते. या वृक्षाची पूजा केल्यामुळे आर्थिक चणचणही दूर होते. 


(वरील माहिती सर्वसामान्य धारणांवर आधारलेली असून, झी 24तास याची खातरजमा करत नाही.)