भारत विरुद्ध तिसऱ्या वनडे आधी इंग्लंडमध्ये 2 मोठे बदल
तिसरा आणि शेवटचा निर्णायक सामना
मुंबई : इंग्लंडने भारताविरुद्ध दुसऱ्या सामन्यात विजय मिळवल्या नंतर तिसऱ्या वनडेत त्यांनी डेविड मलानच्या जागी जेम्स विन्सला संघात स्थान दिलं आहे. वनडे सीरीज आता 1-1 ने बरोबरीत आहेत. शेवटचा वनडे सामना आज हेडिंग्लेमध्ये खेळला जाणार आहे. डेविड मलान आणि सॅम कुरेन यांना संघातून बाहेर करण्यात आलं आहे. डेविड मलानला इंग्लंड लायन्स टीममध्ये सहभागी करुन घेतलं आहे. तो भारत ए संघाविरुद्ध टेस्ट सामना खेळणार आहे.
वेबसाईट ईएसपीएनक्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार मलानला इंग्लंड लायंस टीममध्ये सहभागी करण्यासाठी राष्ट्रीय टीममधून बाहेर करण्यात आलं आहे. इंग्लंड लायंस आणि इंडिया ए यांच्यात 4 दिवसांचा टेस्ट सामना होणार आहे.
याआधी पाकिस्तानविरुद्ध दोन टेस्ट सामन्यांमध्ये तो इंग्लंडच्या टीममध्ये होता. पण 3 इनिंगमध्ये तो फक्त 46 रन करु शकला होता. मलानच्या जागी वनडे टीममध्ये विन्सला संधी देण्यात आली आहे. त्याच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर त्याला संघात स्थान मिळालं आहे. समरसेट विरुद्ध त्याने 109 आणि यॉर्कशायर विरुद्ध त्याने 171 रनची खेळी केली होती.
1 ऑगस्ट पासून 5 टेस्ट सामन्यांच्या सिरीजला सुरुवात होणार आहे. 11 सप्टेंबरपर्यंत ही सिरीज चालणार आहे.
इंग्लंड टीम : ईयोन मोर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, जोस बटलर, मोईन अली, जो रूट, जॅक बॉल, लियाम प्लंकेट, बेन स्टोक्स, आदिल राशिद, डेविड विली, मार्क वुड, जेम्स विन्स.