20 Year Old Cricket Player Died Final Match Video: इंग्लंडमधील एका 20 वर्षीय तरुण क्रिकेटपटूचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. या क्रिकेटपटूचं नाव जोश ऑलिव्हर बेकर असं असून त्याच्या मृत्यूची घोषणा तो ज्या वूस्टरशायर क्रिकेट क्लबसाठी खेळायचा त्यांनीच केली आहे. डावखुरा फिरकीपटू म्हणून स्थानिक क्रिकेटमध्ये चर्चेत असलेल्या जोशच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करताना क्रिकेट क्लबने त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपली सहानुभूती जोशच्या कुटुंबाबरोबर असल्याचं क्लबने म्हटलं आहे. विशेष म्हणजे मृत्यूच्या काही तास आधीपर्यंत जोश वूस्टरशायर क्रिकेट क्लबसाठी मॅच खेळत होता. 


2003 साली झालेला जन्म


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोश हा उजव्या हाताने फलंदाजी करायचा तर तो डावखुरा गोलंदाज होता. त्याचा जन्म 16 मे 2003 रोजी वूस्टरशायरमधील रेडिचमध्ये झाला होता. त्याचा मृत्यू 2 मे रोजी झाला. मृत्यूच्या वेळी तो 20 वर्ष 252 दिवसांचा होता. अष्टपैलू खेळाडू म्हणून तो वूस्टरशायरच्या संघाकडून खेळायचा. तो इंग्लंडच्या 19 वर्षांखालील संघातून खेळला आहे. 2021 मध्ये त्याने प्रथम वर्ग क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 


मृत्यूचं कारण जाहीर केलं नाही


जोशच्या मृत्यूचं कारण वूस्टरशायर क्रिकेट क्लबने जाहीर केलेलं नाही. बेकर कुटुंबियांना या दु:खाच्या प्रसंगी खासगी वेळ द्यावा असं आवाहनही क्लबने केलं आहे. जोशच्या आकस्मिक मृत्यूने क्लबशी संबंधित सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे, असं क्लबच्या मुख्य अधिकारी असलेल्या अॅशली गिल्स यांनी सांगितलं. "जोशच्या निधनाची बातमी ऐकून आम्हाला धक्काच बसला. तो आमच्या संघासाठी केवळ सहकारी नव्हता तर त्याहूनही अधिक खास नातं त्याचं या क्लबबरोबर होतं. तो आमच्या संघाचा अविभाज्य भाग होता. आम्हाला त्याची फार आठवण येईल," असं गिल्स म्हणाल्या. 


नक्की वाचा >> 'मी सर्वांची नावं उघड करणार', बलात्कार प्रकरणातील क्रिकेटरचा इशारा; T20 वर्ल्डकपआधी वाढलं टेन्शन


शेवटच्या सामन्यातील व्हिडीओ व्हायरल


जोशने मृत्यूपूर्वी काही तास आधीच त्याच्या शेवटचा सामना वूस्टरशायर सेकेण्ड इलेव्हन संघासाठी खेळला. समरसेट सेकेण्ड इलेव्हनच्या संघाविरुद्धच्या सामन्यात जोशने 66 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या होत्या. जोशने थॉमस रुला आधी बाद केलं. त्यानंतर जोशने जे. एफ. थॉमस आणि एम. जे. लिच या दोघांना स्वत:च्याच गोलंदाजीवर अप्रतिम झेल पकडत तंबूचा रस्ता दाखवला होता. 1 मे रोजी खेळवण्यात आलेल्या आणि त्याचा शेवटचा सामना ठरलेल्या मॅचमधील व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय..



17 व्या वर्षी पहिला करार


जोशने वयाच्या 17 व्या वर्षी म्हणजेच 2021 ला वूस्टरशायर क्रिकेट क्लबबरोबर पहिला करार केला होता. त्याने 22 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांमध्ये 43 विकेट्स घेतल्या होत्या. पुढे मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये क्लबकडून खेळताना 25 सामन्यांमध्ये 27 विकेट्स घेतल्या. तो अष्टपैलू खेळाडू होता. त्याने दोन अर्धशतकं झळकावली होती. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 75 इतकी होती.