लंडन : इंग्लंडचा दौरा भारतीय टीमसाठी कायमच कठीण राहिला आहे. इंग्लंडचं वातावरण आणि खेळपट्ट्यांमुळे स्विंग होणारा बॉल खेळताना भारतीय बॅट्समनना अडचणीचा सामना करावा लागायचा. यामुळेच इंग्लंड दौऱ्यामध्ये भारतीय टीमला अनेकवेळा पराभवाचा सामना करावा लागला. पण यावेळच्या सीरिजमध्ये परिस्थिती थोडी बदललेली आहे. युवा खेळाडूंचा भरणा असलेली भारतीय टीम तांत्रिकदृष्ट्या भक्कम आहे. याशिवाय टीमचा आत्मविश्वासही दृढ आहे. यावेळचं इंग्लंडचं वातावरणही भारतीय हवामानाला साजेसं असंच आहे. टी-२० सीरिजमध्ये विजय झाल्यानंतर भारताला वनडे सीरिज गमवावी लागली. पण तरीही भारतीय टीमचा आत्मविश्वास अजूनही कायम आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडविरुद्धच्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला १ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या सीरिजमध्ये भारतीय टीमचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये केलेल्या चुका भारतीय टीम इंग्लंडविरुद्ध न करण्याचा प्रयत्न करेल.


भारतीय टीममध्ये अनुभवी खेळाडू


२०१४ सालच्या इंग्लंड दौऱ्यावेळी बहुतेक खेळाडू हे नवीन होते आणि पहिल्यांदाच इंग्लंडच्या दौऱ्यावर गेले होते. पण तरीही लॉर्ड्सच्या मैदानात भारतीय टीमनं शानदार विजय मिळवला होता. सीरिजमध्ये १-० नं आघाडीवर असल्यानंतरही भारतीय टीमचा या सीरिजमध्ये ३-१नं पराभव झाला. मुरली विजय, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे या खेळाडूंच्या कामगिरीवर भारताचं सीरिज विजयाचं स्वप्न अवलंबून आहे.


स्पिनरची भूमिका ठरणार निर्णायक


स्पिनरच्या दर्जेदार कामगिरीमुळे भारतानं गेल्या काही वर्षांमध्ये यश मिळवलं आहे. यावेळी इंग्लंडमध्ये पडलेल्या उन्हाळ्यामुळे तिथल्या खेळपट्ट्याही स्पिनरना मदत करतील असं बोललं जात आहे. अशावेळी विराट कोहलीपुढे अश्विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे तीन पर्याय आहेत. यापैकी कोहली कोणाला संधी देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या टी-२० आणि वनडे सीरिजमध्ये कुलदीपच्या स्पिनपुढे इंग्लंडच्या बॅट्समननी लोटांगण घातलं होतं. कुलदीप यादवनं याआधी २ टेस्ट मॅचमध्ये ९ विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे कुलदीपला संधी मिळाली तर इंग्लंडसमोर अडचण उभी राहू शकते.


काऊंटी क्रिकेटचा अनुभव


भारताचे काही खेळाडू इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत आहेत. तर काही जण भारत अ टीम आणि इंग्लंड लायन्सविरुद्धच्या मॅचमध्येही खेळले. याचा फायदा भारतीय खेळाडूंना होऊ शकतो. चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मा काऊंटीमध्ये खेळत होते. तर मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे भारतीय ए टीमकडून खेळले.


भारतीय टीम


विराट कोहली, शिखर धवन, लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह