दिल्ली : देशात कोरोनाची रूग्णसंख्या वाढताना दिसतेय. अशातच इंडिया ओपन बॅडमिंटनला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका बसला आहे. भारताचे सात स्टार बॅडमिंटनपटू या कोरोनामुळे या स्पर्धेत खेळू शकणार नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, या खेळाडूंमध्ये किदाम्बी श्रीकांत, रितिका ठक्कर, अश्विनी पोनप्पा, त्रिसा जॉली, मिथुन मंजुनाथ, सिमरन सिंग आणि खुशी गुप्ता यांचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने या सात भारतीय खेळाडू कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. मात्र कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूंची नावं उघड केली नाहीत.


"मंगळवारी आरटी-पीसीआर चाचणीसाठी काही खेळाडूंचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याचं," फेडरेशनच्या निवेदनात म्हटलं आहे. सात खेळाडूंच्या जवळच्या संपर्कात आलेल्या दोन जोड्यांनाही स्पर्धेतून बाहेर काढण्यात आलं. दरम्यान प्रतिस्पर्ध्यांना पुढील फेरीत वॉकओव्हर दिलं जाणार आहे.


दरम्यान टूर्नामेंट सुरु होण्यापूर्वीच बी साई प्रणीत, मनू अत्री आणि ध्रुव रावत यांची चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यामुळे ते स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारताला धक्का बसला होता.


बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे आयोजित इंडिया ओपन 2022, इंदिरा गांधी स्टेडियमच्या केडी जाधव इनडोअर हॉलमध्ये आयोजित करण्यात येत आहे. कोरोनाच्या प्रोटोकॉलनुसार, हॉटेल आणि स्टेडियमच्या बाहेर दररोज सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांची कोविड-19 साठी चाचणी केली जाणार आहे.