एका शस्त्रक्रियेने बदललं Rajat Patidar चं आयुष्य, क्रिकेटंही सोडलं असतं पण...
रजतने एलिमिनेटर सामन्यात शतक झळकावून आयपीएलच्या इतिहासात त्याचं नाव कोरलंय.
मुंबई : सध्या क्रिकेटमध्ये रजत पाटीदार या खेळाडूच्या नावाची जोरदार चर्चा आहे. रजतने एलिमिनेटर सामन्यात शतक झळकावून आयपीएलच्या इतिहासात त्याचं नाव कोरलंय. रजत पाटीदार आयपीएलचा नवा स्टार बनला आहे आणि त्याच्या आयुष्याशी संबंधित न ऐकलेल्या गोष्टी हळूहळू समोर येत आहेत.
रजत पाटीदारचा आरसीबीच्या टीममध्ये 20 लाख रुपयांमध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र यानंतर काय घडलं याची कहाणी फार रंजक आहे.
रजत पाटीदार हा क्रिकेटपटू कसा बनला यामागेही स्टोरी आहे. रजत पाटीदारला सुरुवातीला वेगवान गोलंदाज व्हायचं होतं. त्यानंतर तो स्पिन गोलंदाजीकडे वळला आणि अखेरीस फलंदाज म्हणून यशस्वी झाला. वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत या खेळाडूला एज ग्रुप क्रिकेटमध्ये संधीही मिळाली नव्हती.
रजत पाटीदारला लहानपणापासूनच फुटबॉल खेळण्याची खूप आवड होती. 2014 मध्ये, त्याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली. इतकंच नाही तर त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. यावेळी रजत पाटीदार 8 महिने क्रिकेटपासून दूर होता. अशा परिस्थितीत कुटुंबीयांनी त्याला क्रिकेट सोडून शिक्षण पूर्ण करून बिझनेस सांभाळण्यास सांगितलं.
रजत पाटीदार अडून राहिला आणि त्याने चेतेश्वर पुजाराकडून प्रेरणा घेतली. रजत पाटीदारने कुटुंबातील सदस्यांना हे समजावून सांगितलं की, जेव्हा पुजारा दोन्ही गुडघ्यांच्या शस्त्रक्रियेनंतर परत खेळू शकतो तर मी का करू शकत नाही.
फेब्रुवारीमध्ये झालेल्या आयपीएल मेगा लिलावात रजत पाटीदार अनसोल्ड राहिला. मे महिन्यात आयपीएल दरम्यान देशात दुसरी कोणतीही स्पर्धा होणार नव्हती. अशा परिस्थितीत रजत पाटीदार यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या ब्रेकचा चांगला उपयोग करून घ्यायचा होता. रजतच्या आई-वडिलांना आपल्या मुलाने लग्न करावे अशी इच्छा होती. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.