मुंबई : बाहुली... ही अनेकांच्याच हृदयाच्या जवळची. त्यातही ती बार्बी असेल तर त्याची बात काही औरच. बार्बीच्या याच विविध रुपांनी आजव बच्चेकंपनीच्या बालपणात खऱ्या अर्थाने रंगत आणली आहे. किंबहुना अनेकांवर मोठं झाल्यावरही बार्बीच्या या सौंदर्याची भुरळ असल्याचं पाहायला मिळत आहे. अशा या बार्बीचं एक रुप सध्या भारतात, विशेषत: क्रीडा विश्वात सर्वांचच लक्ष वेधत आहे. मुळात त्यामागचं कारणही तसंच आहे. २०१४ मध्ये ग्लासगो येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या आणि ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टीक्स प्रकारात भारताचं नाव उज्वल करणाऱ्या दीपाला थेट बार्बीकडून ही सलाम करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या कामगिरीच्या माध्यमातून पुढच्या पिढीतील मुलींना प्रोत्साहन देणाऱ्या आणि काही बंधनांचे पाश तोडणाऱ्या बार्बीला दीपाच्याच रुपात साकारण्यात आलं आहे. 



१९५९ मध्ये सुरु झालेल्या बार्बीच्या ब्रँडने गोड, गोंडस बाहुलीला डॉक्टर, अंतराळवीर, वृत्तनिवेदक अशा विविध रुपांमध्ये सादर केलं. त्यातच नुकत्याच या कंपनीने साठ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने विविध क्षेत्रांमध्ये आदर्श प्रस्थापित करणाऱ्या महिलांचं यश साजरा करण्यात आलं. आपल्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या काही बंधनांना झुगारुन लावत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची प्रतिकृती असणाऱ्या बार्बी या निमित्ताने साकारण्यात आल्या होत्या. यासंहदर्भातील ट्विटही बार्बीच्या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आलं. ज्यामध्ये जवळपास २० विविध रुपातील बार्बी होत्या. 




बार्बीकडून साकारण्यात आलेल्या जिम्नॅस्टचा पेहराव घातलेल्या आणि गळ्यात कांस्यपदक असणाऱ्या बाहुलीचा फोटो दीपाने तिच्या ट्विटरवर शेअर करत याविषयीचा आनंद व्यक्त केला. बार्बीकडून मिळालेल्याया अनोख्या बहुमानाबद्दल आभार मानत तिने एक ट्विट केलं. 'मुली काहीही करु शकतात हे बार्बीने नेहमीच दाखवून दिलं आहे. त्यांच्या साठाव्या वर्षपूर्तीसाठीच्या संकल्पनेत मला सहभागी करुन घेतलं जाणं ही मी सन्मानाचीच बाब समजते', असं तिने या ट्विटमध्ये लिहिलं. हे ट्विट पाहता सोशल मीडियावर अनेकांनीच शुभेच्छा देत बार्बीचीही प्रशंसा केल्याचं पाहायला मिळालं.