मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी आयपीएलबाबत एक दावा केला आहे. त्यांनी म्हटलं की, 'विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुर आयपीएलचा 12 वर्षाचा दुष्काळ संपवून या वेळी जेतेपद जिंकू शकते. बंगळुरूचा संघ ज्या प्रकारे दिसत आहे, तो या विजेतेपदाचा दावेदार आहे.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरूने 2009, 2011 आणि 2016 मध्ये आयपीएल फायनल खेळले आहेत पण आतापर्यंत त्यांना ट्रॉफी जिंकता आलेली नाही.


वेंगसरकर म्हणाले की, 'या टी-२० स्वरूपाच्या स्पर्धेत सर्वात भक्कम दावेदार कोण हे सांगणे कठीण आहे. पण मी म्हणेन की यावेळी बंगळुरू जिंकेल, कारण त्यांनी अद्याप आयपीएलचे एकही विजेतेपद जिंकलेले नाही. कोहली, डिव्हिलियर्स, युझवेंद्र चहल चांगली कामगिरी करतील. संघात बरेच चांगले खेळाडू आहेत. पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने शानदार गोलंदाजी केली. त्यामुळे तो या स्पर्धेत पुढे कसा खेळतो यात मला रस आहे.'


वेंगसरकर म्हणाले की, 'या वेगाने बदलणार्‍या टी-20 प्रकाराबाबत निश्चितपणे काहीही सांगता येणार नाही. कोण जिंकणार हे आताच सांगणं कठीण आहे. पण बंगळुरु एक प्रबळ दावेदार असू शकतो.'


आयपीएल दुसर्‍यांदा युएईमध्ये होत आहे. यापूर्वी 2014 मध्ये भारतात लोकसभा निवडणुकीमुळे निम्मे आयपीएल सामने हे युएईमध्ये खेळले गेले होते.


युएईच्या परिस्थितीबाबत माजी कर्णधार म्हणाले की, 'युएई मधील हवामान दमट आहे. भारतात तुम्ही १०-१२ ठिकाणी आयपीएल खेळता आणि तिथे तुम्ही फक्त तीन ठिकाणी खेळत आहात. त्यामुळे खेळपट्या बदलू शकतात. हे पाहणं मनोरंजक असेल'.


'खेळपट्ट्या नंतर फिरकी गोलंदाजांना उपयुक्त ठरेल. नंतर हवामान देखील बदलेल. दव फॅक्टर खूप महत्वाचा आहे कारण चेंडू पकडणे कठीण होते, खासकरून दव असल्यास स्पिनरसाठी. ते घडलेच पाहिजे. परंतु आपल्याकडे दररोज दव पडत नाही, काही दिवसांनी असे होते'.