मुंबई : 'ट्रेजेडी किंग' म्हणून ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप घेतला. वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा निरोप घेतला. हिंदूजा रुग्णालयात त्यांची प्राणज्योत माळवली. त्यांनी आपल्या सिने कारकिर्दीत एक से एक सिनेमे केले. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीसह संपूर्ण क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तुम्हा आम्हाला दिलीप कुमार अभिनयाचे बादशाह म्हणून ज्ञात होतेच. पण ते क्रिकेट पारखीही होते. दिलीप कुमार यांनी एका खेळाडूची शिफारस केली. त्यानंतर या खेळाडूला टीम इंडियाकडून 1983 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळाली. याच खेळाडूच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात धडक मारली होती. (actor dilip kumar has recommended yashpal sharma to bcci)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोण आहे तो खेळाडू?


आपण बोलतोय ते टीम इंडियाचे माजी फलंदाज यशपाल शर्मा यांच्या बद्दल. यशपाल शर्मा यांनी 1983 चा वर्ल्ड कप जिंकण्यात मोलाची भूमिका बजावली होती. आपली शिफारस केल्याचा किस्सा स्वत: यशपाल शर्मा यांनी टीव्ही शो मध्ये सांगितला होता.


यशपाल शर्मा काय म्हणाले होते? 


"तुम्ही सर्व दिलीप कुमारांना दिलीप साहेब म्हणता, पण मी त्यांना युसूफ भाई म्हणतो. त्या मागचा एक किस्सा आहे. माझी क्रिकेट कारकिर्द घडवण्यात जर कोणाचा हात आहे, तर तो युसूफ भाई यांचा आहे", असं यशपाल शर्मा यांनी नमूद केलं होतं.



"मी तेव्हा रणजी क्रिकेटपटू होतो. तेव्हा एका कंपनीसाठी मैदानात नॉकआऊट (बाद फेरी) सामना खेळत होतो. दिलीप कुमार त्याचे चेयरमन होते.  मी सामन्यातील पहिल्या डावात शतकी खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात 80 धावांच्या आसपास खेळत होतो. त्या दरम्यान मैदानात काही गाड्या आल्या. मला वाटलं कोणी स्थानिक नेता असेल. त्यांनी काही विचारलं असावं, ज्याबाबत मला नंतर माहित झालं. मी शतक ठोकल्यानंतर त्यांनी टाळ्या वाजवून माझा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला.  त्यानंतर ते निघून गेले, असं मला वाटलं. त्यानंतर सामना संपला. यानंतर मला स्टेडियमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की तुला कोणी भेटायला आलंय. त्यानुसार मी ऑफीसमध्ये गेलो. माझ्या समोर युसूफ भाई उभे होते. त्यांनी माझ्याशी हस्तांदोलन केलं. तुझ्यात दम आहे. तुला क्रिकेटमध्ये संधी मिळावी, यासाठी मी कोणासोबत तरी बोलतो", असा सर्व किस्सा यशपाल शर्मा यांनी सांगितला.


यशपाल यांची कोणाकडे शिफारस?  


दिलीप कुमारांनी यशपाल शर्मांना शब्द दिला होता. त्यानंतर दिलीप कुमारांनी यशपाल यांची शिफारस राजसिंह डुंगरपूर यांच्याकडे केली. राजसिंह यांचा तेव्हा बीसीसीआयमध्ये दबदबा होता. याबाबत सांगताना यशपाल म्हणाले की, "पंजाबचा एक मुलगा आहे जो रणजी क्रिकेट खेळतोय. मी त्याची बॅटिंग पाहून आलोय, असं दिलीप कुमार राजसिंह यांना सांगितलं", असं यशपाल यांनी नमूद केलं. दिलीप कुमार यांच्या शिफारशीनंतर राजसिंह यांनी यशपाल शर्मांच्या बाबतीत बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता.


यशपाल यांच्याबद्दल थोडक्यात


यशपाल शर्मा हे 80 च्या दशकातील टीम इंडियाचे महत्वाचे आणि विश्वासू फलंदाज होते. यशपाल यांनी 1983 च्या वर्ल्ड कपमधील पहिल्या सामन्यात वेस्टइंडिज विरुद्ध 89 धावांची शानदार खेळी केली होती. यशपाल यांच्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने विजयी सलामी दिली होती. 


यानंतर यशपाल शर्मा यांनी वर्ल्ड कप स्पर्धेत निर्णायक क्षणी जोरदार बॅटिंग केली. इंग्लंड विरुद्धच्या सेमी फायनल सामन्यात यशपाल यांनी 61 धावांची खेळी केली. ही खेळी आजही प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या लक्षात आहे. टीम इंडियाने  या सामन्यात इंग्लंडला 6 विकेट्सने पराभूत केलं होतं. इतकेच नव्हे तर यशपाल यांनी याच सामन्यात डायरेक्ट थ्रो करत  अॅलन लँबला रनआऊट केलं होतं.