मुंबई : रवी शास्त्री यांची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा निवड झाली आहे. क्रिकेट सल्लागार समितीने शास्त्रींच्या नावाला पसंती दिल्यानंतर रवी शास्त्री यांचा पुन्हा प्रशिक्षक बनण्याचा मार्ग मोकळा झाला. प्रशिक्षकाच्या निवडीनंतर आता टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफच्या निवडीसाठीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. सपोर्ट स्टाफची निवडीचे अधिकारही आम्हालाच देण्यात यावेत, अशी मागणी क्रिकेट सल्लागार समितीने केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने याला नकार दिला. त्यामुळे जुन्याच प्रक्रियेनुसार सपोर्ट स्टाफची निवड होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सपोर्ट स्टाफ निवडीची जबाबदारी क्रिकेट सल्लागार समितीला दिली असती, तर ते बीसीसीआयच्या नव्या संविधानाचं उल्लंघन झालं असतं. बीसीसीआयच्या नव्या संविधानानुसार मुख्य प्रशिक्षक निवडीचा अधिकार क्रिकेट सल्लागार समितीला आहे. तर सपोर्ट स्टाफ निवडण्याची जबाबदारी निवड समितीकडे असेल. सपोर्ट स्टाफची निवड करताना मुख्य प्रशिक्षकाची भूमिकाही महत्त्वाची असते, कारण सपोर्ट स्टाफला मुख्य प्रशिक्षकाच्या खाली काम करावं लागतं.


सपोर्ट स्टाफच्या निवडीची जबाबदारी एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालची ५ सदस्यीय निवड समितीवर आहे. सोमवारी या प्रक्रियेला सुरुवात झाली असून गुरुवारपर्यंत सपोर्ट स्टाफच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे.


सपोर्ट स्टाफमध्ये, बॅटिंग प्रशिक्षक, बॉलिंग प्रशिक्षक, फिल्डिंग प्रशिक्षक, ट्रेनर यांचा समावेश आहे. भरत अरुण यांचं पुन्हा बॉलिंग प्रशिक्षक बनणं जवळपास निश्चित आहे, कारण मागच्या काही वर्षांमध्ये भारताच्या बॉलरनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तर फिल्डिंग प्रशिक्षक आर. श्रीधरदेखील टीमसोबत कायम राहतील, असं बोललं जात आहे. श्रीधर यांची पुन्हा नियुक्ती झाली, तर मात्र जॉन्टी ऱ्होड्सला खाली हात परतावं लागेल.


बॅटिंग प्रशिक्षक असलेल्या संजय बांगर यांची पुन्हा नियुक्ती होणार नाही असा अंदाज आहे. चौथ्या क्रमांकासाठी उपयुक्त बॅट्समन न सापडल्यामुळे बांगर यांचं पद धोक्यात आहे. या पदासाठी विक्रम राठोड आणि प्रविण आमरे यांनी अर्ज दिला आहे.