`एका दिवसात नरेंद्र मोदी...`; BCCIमधून बाहेर पडल्यानंतर सौरव गांगुलीने सोडलं मौन
तुमचा स्वतःवर विश्वास असणं हेच आयुष्य आहे, असेही गांगुली म्हणाला
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याचा कार्यकाळ पुढील आठवड्यात संपणार आहे. सौरव गांगुलीने ऑक्टोबर 2019 मध्ये बोर्डाचे अध्यक्षपद स्वीकारले होते. पुढील आठवड्यापर्यंत गांगुली तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहे. त्यानंतर आता गांगुलीच्या जागी रॉजर बिन्नी बीसीसीआयच्या (BCCI) अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. 18 ऑक्टोबरला बीसीसीआयला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या (BCCI) सर्व पदांसाठी निवडणूक होणार असून, त्यासाठी उमेदवारांना 11 आणि 12 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरायचे आहेत. माजी विश्वचषक विजेत्या संघाचे खेळाडू रॉजर बिन्नी (roger binny) यांनीच आतापर्यंत बीसीसीआयच्या (BCCI) अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे, त्यामुळे त्यांची या पदासाठी बिनविरोध निवड होऊ शकते.
सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) बीसीसीआयमधून (BCCI) बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच भाष्य केले आहे. गांगुलीच्या केलेल्या वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडल्यानंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) पहिल्यांदाच माध्यमांसमोर आला आहे. 'मी पाच वर्षे क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचा (CAB) अध्यक्ष होतो. त्यानंतर मी तीन वर्षे बीसीसीआयचा अध्यक्षही होतो. या सर्व जबाबदाऱ्या स्वीकारल्यानंतर मला लागतंय आणि आता मी दुसरे काहीतरी करेन. एक क्रिकेटर म्हणून तुमच्यासमोर आव्हाने खूप मोठी असतात आणि प्रशासक म्हणून तुम्हाला असंच योगदानही द्यावं लागतं. एक नेता म्हणून, तुम्ही करिअर आणि एक संघ तयार करता, असे सौरव गांगुली म्हणाला.
"तुम्हाला संघासाठी चांगल्या गोष्टी कराव्या लागतील. एक खेळाडू म्हणून मी बराच काळ खेळलो आणि मला खूप आनंद झाला. प्रशासक म्हणून, मी काही संस्मरणीय आणि उत्कृष्ट क्षणांचा एक भाग होतो. तुम्ही कायमचे खेळू शकत नाही आणि तुम्ही कायमचे प्रशासकही होऊ शकत नाही," असे सौरव गांगुली म्हणाला. सौरव गांगुलीच्या या विधानात वेदना आणि निराशा स्पष्टपणे दिसत आहे.
"मी प्रशासक राहिलो आहे आणि आता मी वेगळं काही करेन. तुमचा स्वतःवर विश्वास असणं हेच आयुष्य आहे. प्रत्येकजण परीक्षा देतो आणि प्रत्येकजण अपयशी ठरतो, पण उरतो तो स्वतःवरचा विश्वास," असे गांगुली म्हणाला.
एका दिवसात सचिन तेंडुलकर किंवा नरेंद्र मोदी बनत नाही
"लॉर्ड्सवर पदार्पणाच्या वेळी माझी मानसिकता सर्वोत्तम होती. मी तिथे माझा खेळ करून पाहिला. मोठं काम करण्यासाठी प्रत्येकजण छोटी पावले उचलतो. त्यासाठी प्रत्येक वेळी मेहनत करावी लागते. सर्वकाही पटकन मिळवायचे असेल तर ते शक्य नाही. तुम्ही एका दिवसात सचिन तेंडुलकर किंवा नरेंद्र मोदी बनत नाही," असेही गांगुली म्हणाला.
दरम्यान, भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी (roger binny) यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र आतापर्यंत अन्य कोणत्याही उमेदवाराने अर्ज भरला नसल्याने त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. सौरव गांगुलीला बीसीसीआयमध्ये (BCCI) कोणताच पाठिंबा मिळाला नाही, त्यानंतर त्याला निराशेने बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडावे लागले.