मुंबई : पॅट कमिन्सनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने देखील कोरोना साथीच्या विरूद्ध लढ्यात भारताला मदत करण्याची घोषणा केली आहे. ब्रेट लीने म्हटले आहे की, भारतातील रूग्णालयात ऑक्सिजन पुरवण्यासाठी आपण 1 बिटकॉइन (सुमारे 42 लाख रुपये) देणार आहोत. ब्रेट ली म्हणाला की, भारत त्याच्यासाठी कायमच दुसर्‍या घरासारखं राहिलं आहे. आपल्या कारकीर्दीत आणि सेवानिवृत्तीनंतर त्याला या देशातील लोकांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी त्यांच्या हृदयात एक विशेष स्थान आहे. साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर लोक संघर्ष करत असताना पाहून फार दु:ख झाले. भारतातील रूग्णालयात ऑक्सिजन पुरवण्यासाठी 1 बिटकॉइन दान करण्याची इच्छा आहे.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रेट ली पुढे म्हणाला की, आता सर्वांनी एकत्र येण्याची आणि गरजू लोकांना मदत करण्याची वेळ आली आहे. या सर्व कठीण परिस्थितीत काम करणाऱ्या व्यक्तींचे आभार मानतो. कृपया काळजी घ्यावी, घरीच राहावे, हात धुवावेत आणि आवश्यक असल्यास घराबाहेर पडावे, मास्क घालावे व सामाजिक अंतर राखावे, असा आग्रह त्याने केला. पॅट कमिन्सचे ही त्याने कौतुक केले.


कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने सोमवारी भारताला ऑक्सिजन पुरवण्यासाठी पीएम केअर फंडला $ 50000 (सुमारे 38 लाख रुपये) देणगी जाहीर केली होती. कमिन्सनेही आयपीएल सुरू ठेवण्यास पाठिंबा दर्शविला. ट्विटरवर त्याने ही घोषणा केली आणि भारताला इतर खेळाडूंनाही मदत करण्याची विनंती केली.