मुंबई : पाकिस्तानचा वादग्रस्त क्रिकेटपटू अहमद शहजाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अहमद शहजाद अंमली पदार्थ चाचणीमध्ये दोषी आढळला आहे. यामुळे शहजादवर तीन महिन्यांची बंदी येऊ शकते. अहमद शहजाद अनेकवेळा अनुशासनहिनतेमुळे चर्चेत आला होता. जिओ न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान कपदरम्यान शहजादची चाचणी घेण्यात आली होती. १९ एप्रिल ते १ मे दरम्यान पाकिस्तान कप स्पर्धा झाली होती. शहजादनं या स्पर्धेत सर्वाधिक ३७२ रन केले होते. यामध्ये ३ अर्धशतकं आणि एका शतकाचा समावेश होता.


शहजादनं गांजा घेतला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमद शहजादवर गांजा घेतल्याचा आरोपही होत आहे. सुरुवातीच्या चाचणीमध्ये शहजाद दोषी आढळला आहे. पण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर याबद्दल अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यानं दिली आहे. आयसीसीच्या नियमांनुसार जोपर्यंत सरकारी यंत्रणा दोषी ठरवत नाही तोपर्यंत खेळाडूवर कारवाई करता येत नाही, अशी प्रतिक्रिया पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नज्म सेठी यांनी दिली आहे.


अहमद शहजाद एप्रिल २०१७ साली वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटची टेस्ट तर ऑक्टोबर २०१७ साली श्रीलंकेविरुद्ध शेवटची वनडे खेळला होता. यावर्षी जूनमध्ये स्कॉटलंडविरुद्धच्या दोन टी-20 मध्येही शहजाद पाकिस्तान टीममध्ये होता. या मॅचमध्ये शहजादनं १४ आणि २४ रन केल्या होत्या. शहजादनं १३ टेस्ट, ८१ वनडे आणि ५७ टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत.