भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज अजय जडेजाने (Ajay Jadeja) गतवर्षी 2023 वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघाला मार्गदर्शन केलं होतं. अजय जडेजाच्या मार्गदर्शनामुळे अफगाणिस्तान संघाने वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केली होती. अनेक दिग्गज संघांना त्यांनी कडवी झुंज दिली होती. पण अजय जडेजाने अफगाणिस्तान संघाला मार्गदर्शन केल्याबद्दल कोणतंही मानधन घेण्यास नकार दिला. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे (ACB) सीईओ नसीब खान (Naseeb Khan) यांनी हा खुलासा केला आहे. आपण अनेकवेळा अजय जडेजाला विनंती केली मात्र त्याने दरवेळेस नकार दिला अशी माहिती त्यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नसीब खान यांनी सांगितलं आहे की, "आम्ही अनेकदा विनंती केली, पण अजय जडेजाने 2023 वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तान संघाला मार्गदर्शन केल्याबद्दल कोणतेही पैसे घेण्यास नकार दिला. त्याचं फक्त एवढंच म्हणणं होतं की, तुम्ही चांगले खेळा तेच माझं मानधन आणि बक्षीस असेल".


2023 एकदविसीय वर्ल्डकप सुरु होण्याच्या काही दिवस आधीच अजय जडेजाला अफगाणिस्तान संघाचा मेंटॉर म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. अफगाणिस्तान संघाने वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान, इंग्लंड आणि बांगलादेश यांचा पराभव करत जबरदस्त कामगिरी केली होती. पण ग्लॅन मॅक्सवेलच्या दुहेरी शतकाने त्यांचं सेमी-फायनलसाठी पात्र होण्याचं स्वप्न भंगलं. 


53 वर्षीय जडेजाने भारतासाठी 196 एकदिवसीय सामने खेळले असून, 37.47 च्या सरासरीने 6 शतकं आणि 30 अर्धशतकांसह 5359 धावा केल्या आहेत. त्याने 1992 ते 2000 दरम्यान भारतासाठी 15 कसोटी सामने खेळले, चार अर्धशतकांसह 26.18 च्या सरासरीने 576 धावा केल्या. त्या वेळी मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी अफगाणिस्तान संघाच्या खेळीत अजय जडेजाचा मोठा वाटा होता असं म्हटलं होतं. 


गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर जडेजाने अफगाणिस्तानच्या ड्रेसिंग रूममधीव वातावरणाबद्दल सांगितलं होतं. पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफ याने घेतलेल्या मुलाखतीत अफगाणिस्तान संघाला पाकिस्ताविरोधात विजय मिळवून देण्यात मदत करणाऱ्या अजय जडेजाने भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यांपेक्षा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सामने अधिक संघर्षमय असतात असं सांगितलं होतं. 


"भारतात झालेल्या 50 षटकांच्या विश्वचषकात, मी अफगाण संघाचे जवळून निरीक्षण केले. पाकिस्तानवर विजय मिळविल्यानंतर ड्रेसिंग रूम सेलिब्रेशनच्या मूडमध्ये होती, जणू काही सर्वजण मद्यपान न करता मद्यधुंद अवस्थेत होते," असं जडेजा म्हणाला होता. "बऱ्याच लोकांनी मला मॅचनंतर कसं वाटलं असं विचारलं होतं. मी स्पष्ट केलं होतं, की जर पाकिस्तान-भारत सामन्यांमधील शत्रुत्व दहापट असेल तर ती पाकिस्तान-अफगाणिस्तान सामन्यांमध्ये शंभरपट आहे," असंही तो पुढे म्हणाला.