लंडन : दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये ३९६ रनवर डाव घोषित केल्यानंतर इंग्लंडनं भारताला पुन्हा धक्के दिले आहेत. स्कोअरबोर्डवर १३ रन असतानाच भारताचे दोन्ही ओपनिंग बॅट्समन माघारी परतले आहेत. पहिल्या इनिंगमध्ये भारताच्या ५ विकेट घेणाऱ्या जेम्स अंडरसननंच भारताला या इनिंगमध्येही दोन्ही धक्के दिले. पहिल्या इनिंगप्रमाणेच दुसऱ्या इनिंगमध्येही मुरली विजय शून्यवर आऊट झाला. तर लोकेश राहुलला १० रन करण्यात यश आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर भारताच्या दोन विकेट गेल्यानंतर कर्णधार विराट कोहली मैदानात येणं अपेक्षित आहे. पण विराट कोहलीऐवजी चौथ्या क्रमांकावर भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे बॅटिंगला आला आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवसाचा म्हणजेच शनिवारचा काही भाग आणि रविवारी सकाळी विराट कोहली मैदानात फिल्डिंगला उतरला नाही. पाठीला दुखापत झाल्यामुळे कोहलीला पॅव्हेलियनमध्येच बसावं लागलं. फिल्डिंगवेळी विराट कोहली मैदानात नसल्यामुळेच त्याला चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला येता आलं नाही. आयसीसीच्या नियमांनुसार खेळाडू जेवढा वेळ मैदानाबाहेर असेल तेवढा वेळ त्याला बॅटिंगला येता येत नाही. आता अजिंक्य रहाणे किंवा चेतेश्वर पुजारापैकी एकाची विकेट गेली तर विराटला बॅटिंगला येता येईल. 


इंग्लंडकडे पहिल्या इनिंगची २८९ रनची आघाडी असल्यामुळे आता भारताला टेस्ट मॅच वाचवण्यासाठीच खेळावं लागणार आहे. बर्मिंगहममध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननी पराभव झाला होता. या मॅचमध्येही भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं तर सीरिजमध्ये कमबॅक करणं अवघड होणार आहे. विराट कोहलीची दुखापत किती गंभीर आहे हे अजूनही समजू शकलेलं नाही.