एंटिगा : अजिंक्य रहाणेचं शतक आणि हनुमा विहारीच्या अर्धशतकामुळे भारताने वेस्ट इंडिजपुढे डोंगराएवढं आव्हान ठेवलं आहे. पहिली टेस्ट मॅच जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजला ४१९ रनची गरज आहे. अजिंक्य रहाणेने टेस्ट क्रिकेटमधलं त्याचं १०वं शतक झळकावलं. २०१७नंतर अजिंक्य रहाणेचं हे टेस्टमधलं पहिलंच शतक आहे. या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये रहाणेचं शतक हुकलं होतं. ८१ रन करुन रहाणे आऊट झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चौथ्या दिवसाची सुरुवात १८५/३ अशी करणाऱ्या भारताला सुरुवातीलाच कोहलीच्या रुपात पहिला धक्का लागला. कर्णधार विराट कोहली ५१ रन करुन आऊट झाला. यानंतर अजिंक्य रहाणेने हनुमा विहारीच्या साथीने भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेलं. अजिंक्य रहाणे २४२ बॉलमध्ये १०२ रन करुन आऊट झाला. तर हनुमा विहारीने १२८ बॉलमध्ये ९३ रन केले. हनुमा विहारीची विकेट गेल्यानंतर भारताने डाव ३४३/७ या स्कोअरवर घोषित केला. पहिल्या इनिंगमध्ये भारताला ७५ रनची आघाडी मिळाल्यामुळे वेस्ट इंडिजला ४१९ रनचं आव्हान मिळालं.


वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या, तर केमार रोच, शेनन गॅब्रियल आणि जेसन होल्डरला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधली या दोन्ही टीमची ही पहिलीच मॅच आहे, त्यामुळे ही मॅच जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये बोनी करण्याचा भारतीय टीमचा प्रयत्न यशस्वी होईल, असंच म्हणावं लागेल.