मुंबई : टेस्ट फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडे असे काही बॅट्समन आहेत ज्यांना विरूद्ध टीमना आऊट करणं खूप कठीण आहे. त्यापैकी एक नाव म्हणजे फलंदाज अजिंक्य रहाणे, जो कसोटी टीमतील महत्त्वाचा खेळाडू आहे. पण दुखापतीमुळे हा खेळाडू बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे, मात्र लवकरच तो कर्णधार म्हणून पुन्हा एकदा मैदानावर उतरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी दिलीप ट्रॉफीसाठी बीसीसीआयने अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. रहाणे पुन्हा कर्णधार म्हणून मैदानावर उतरणार असल्याची चर्चा असतानाच त्याच्या एका फोटोने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 


अजिंक्य रहाणेचा नवा लूक


भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणेने त्याचा एक नवा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये रहाणे फारच वेगळ्या लूकमध्ये दिसून येतोय. हा फोटो पोस्ट केल्यानंतर अनेकांना रहाणेला ओळखणं कठीण झालं होतं. रहाणेने या फोटोसोबत एक अप्रतिम कॅप्शन पोस्ट केलंय.



दुखापतीमुळे रहाणे टीम इंडियातून बाहेर


यंदाच्या आयपीएलमध्ये फलंदाज अजिंक्य रहाणेला नव्या टीमची साथ मिळाली आणि ती नवी टीम म्हणजे KKR. या टीमने रहाणेला 1 कोटींच्या मूळ किमतीत खरेदी केलं. पण लीगमध्येच तो जखमी झाला आणि तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर होता. मात्र आता पुन्हा एकदा तो मैदानावर उतरणार आहे.


रहाणेकडे पुन्हा कर्णधारपद


अजिंक्य रहाणे येत्या काही दिवसांत भारतीय देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा दुलीप ट्रॉफीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ही स्पर्धा पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. पश्चिम विभागाच्या टीममध्ये मुंबईतील नऊ खेळाडूंची निवड झाली आहे.


विभागीय निवड समितीने मुंबईचे आघाडीचे फलंदाज पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल, शम्स मुलाणी आणि सुवाद पारकर यांची निवड केलीये. त्याचवेळी रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत शतक झळकावणारा यष्टीरक्षक फलंदाज हार्दिक तामोरनेही संघात स्थान मिळवले. 


भारताचा माजी वेगवान गोलंदाज सलील अंकोला यांच्या अध्यक्षतेखालील क्षेत्रीय निवड समितीने दुलीप करंडक स्पर्धेसाठी पश्चिम विभागीय स्टार-स्टर्ड टीममध्ये श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांची निवड केली आहे आणि टीमचं नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे.