मुंबई : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी आता सेलिब्रिटीही पुढे सरसावल्या आहेत. टीम इंडियाचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीला १० लाख रुपयांची मदत केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोरोनाचा सामना करण्यासाठी पीएम केयर्स फंडाला मदत करा, असं आवाहन केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रहाणेने केलेली ही मदत कोरोनाशी लढताना गरजूंना अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी वापरली जाणार आहे. अजिंक्य रहाणेनेही आपण मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केल्याला दुजोरा दिला आहे. विक्रम साठ्ये यांनी केलेल्या ट्विटला रहाणेने उत्तर दिलं.


'माझ्याकडून ही छोटीशी मदत आहे. समुद्रात मी फक्त पाण्याचा एक थेंब टाकला आहे. या कठीण प्रसंगी मदत करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. घरामध्येच सुरक्षित राहा,' असं रहाणे म्हणाला.



'व्यावसायिक आणि खेळाडू कोरोनाशी सामना करण्यासाठी देशाला पाठिंबा देत आहेत हे बघून आनंद झाला. अजिंक्य रहाणेने आज मुख्यमंत्री सहायता निधीला १० लाख रुपये दिले. याआधीही रहाणेने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला', असं ट्विट विक्रम साठ्ये यांनी केलं.



कोरोना व्हायरसमुळे सगळ्या क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. खेळाडूही कोरोनाच्या धोक्यामुळे घरातच आहेत. अजिंक्य रहाणेबरोबरच इतर अनेक खेळाडूंनी सरकारला आर्थिक मदत केली आहे. बीसीसीआयने पीएम केयर्स फंडाला ५१ कोटी रुपये दिले.


सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्री सहायता निधीला २५ लाख आणि पंतप्रधान सहायता निधीला २५ लाख रुपयांची मदत केली. तर सौरव गांगुलीने गरजूंना ५० लाख रुपयांचे तांदूळ द्यायचा निर्णय घेतला आहे. धावपटू हीमा दासने एक महिन्याचा पगार आसाम सरकारच्या सहायता निधीला द्यायची घोषणा केली आहे. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनीही आर्थिक मदत केली आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशभरात कोरोोनाचे ९७९ रुग्ण आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे २५ जणांचा मृत्यू झाला आहे.