मुंबई : कोल्हापूर आणि सांगलीला आलेल्या महापुरामुळे अनेकांचं संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या महापुरामुळे जीवितहानीही झाली आहे, तर अनेक जनावरंही दगावली आहेत. महाप्रलयाच्या या थैमानामुळे शेतीचंही कोट्यवधींचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे बेघर झालेल्या हजारो नागरिकांसाठी मदतीचा ओघ मोठ्याप्रमाणावर येत आहे. सामान्य जनतेपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनी पूरग्रस्त भागांमध्ये शक्य तेवढ्या मदतीचा हात पुढे केला आहे.
भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेनेही या पूरग्रस्तांना मदत केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'महाराष्ट्रात सध्या पूरामुळे प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर-सांगली येथे विशेष मदतीची गरज आहे. अशा वेळी आपण पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मी मदत करून माझा खारीचा वाटा उचलतो आहे, आपणसुद्धा जमेल तशी मदत नक्की करा,' असं ट्विट अजिंक्य रहाणेने केलं आहे.



राज्यातल्या पूरग्रस्तांसाठी मराठी सेलिब्रिटींनीही मदतीला सुरुवात केली आहे. सुबोध भावे, सई ताम्हणकर, कुशल बद्रिके यांच्यासारखे बरेच कलाकार पुढे आले आहेत. रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाखांची मदत केली आहे.