लंडन : भारत आणि इंग्लंडमध्ये शेवटची आणि तिसरी वनडे मॅच १७ जुलैला खेळवण्यात येणार आहे. या मॅचनंतर ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. अजून भारताच्या टेस्ट टीमची निवड झाली नसली तरी भारताचे दोन खेळाडू आधीच इंग्लंडमध्ये पोहोचले आहेत. अजिंक्य रहाणे आणि मुरली विजय टेस्ट मॅचआधी सराव करण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. इंग्लंड लायन्सविरुद्ध भारताचा अ संघ शेवटची मॅच खेळणार आहे. या प्रथम श्रेणी मॅचमध्ये मुरली विजय आणि अजिंक्य रहाणेला संधी मिळेल. १६ जुलैपासून या मॅचला सुरुवात होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि वनडे सीरिजसाठी अजिंक्य रहाणे आणि मुरली विजयची टीममध्ये निवड झालेली नव्हती. जून महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या टेस्टवेळी हे दोघंही टीममध्ये होते. इंग्लंड लायन्सविरुद्धच्या मॅचवेळी किंवा नंतर भारतीय टेस्ट टीमची निवड होऊ शकते. पण रहाणे आणि मुरली विजय यांची टीममधली निवड निश्चित असल्यामुळे त्यांना आधीच इंग्लंडला पाठवण्यात आल्याचं बोललं जात आहे. याआधी इशांत शर्मा आणि चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत आहेत.


२०१४ सालच्या इंग्लंड दौऱ्यामध्ये पहिल्या टेस्टमध्ये मुरली विजयनं शतक झळकवलं होतं. तर लॉर्ड्सच्या हिरव्या खेळपट्टीवर अजिंक्य रहाणेचंही शतक झालं होतं. लॉर्ड्सच्या या टेस्ट मॅचमध्ये भारताचा विजय झाला होता. यावेळी मात्र विजय आणि रहाणेला इंग्लंडमध्ये सरावाला संधी मिळालेली नाही. त्यामुळे निवड समिती, संघ व्यवस्थापन आणि भारतीय अ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मिळून या दोघांना भारताच्या अ संघामध्ये खेळवण्याची रणनिती आखली आहे.