वगळलेल्या खेळाडूंवरील प्रश्नावर आगरकर चिडून म्हणाला, `पण त्यांच्याऐवजी कोणाला...`
Ajit Agarkar Take On Left Out Players From Sri Lanka Tour: अजित आगरकरला अनेकांनी संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्याने अगदीच थेट उत्तर दिलं.
Ajit Agarkar Take On Left Out Players From Sri Lanka Tour: भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आणि सध्या भारतीय क्रिकेट नियाम मंडळाच्या निवड समितीचा प्रमुख असलेल्या अजित आगरकरने सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक कठोर प्रश्नांची अगदी सहजरित्या उत्तरं दिल्याचं पाहायला मिळालं. मुख्य प्रशिक्षक म्हणून रुजू झालेल्या गौतम गंभीरबरोबर आगरकरने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. निवड समितीने अनेक खेळाडूंना टी-20 तसेच एकदिवसीय संघामध्ये स्थान दिलेलं नाही त्यावरुनच आगरकरला अनेक प्रश्न विचारण्यात आले. खास करुन संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा या तिघांना उत्तम कामगिरीनंतरही वगळण्यात आल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता एखाद्या भेदक यॉर्करप्रमाणे आगरकरने या प्रश्नाला थेट उत्तर दिलं.
या तिघांना वगळल्याने आश्चर्य
आगरकरने संघ निवडीसंदर्भात बोलताना अतिंम 15 मध्ये सर्वच खेळाडूंचा समावेश करता येत नाही, असं स्पष्टपणे सांगितलं. संजू सॅमसन, ऋतुराज आणि अभिषेक यांनी झिम्बाब्वे दौऱ्यावर भारताकडून खेळताना उत्तम कामगिरी केल्याने त्यांना श्रीलंकेविरुद्ध नक्की संधी दिली जाईल असं मत व्यक्त केलं जात होतं. मात्र संजूला टी-20 सामन्यांसाठी संघात जागा मिळाली असली तरी अभिषेक आणि ऋतुराजला पूर्णपणे डावलण्यात आलं आहे. यासंदर्भात विचारण्यात आलं असता आगरकरने कोणाला काय वाटेल याचा फारसा विचार न करता निवड समितीची भूमिका पत्रकारांसमोर मांडली. झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 सामन्यात अभिषेकने शतक झळकावलं होतं.
ज्यांना निवडण्यात आलं आहे ते...
"ज्या खेळाडूला संघात जागा मिळाली नाही त्याला प्रत्येकाला वाईट वाटणार. आमच्यासमोर केवळ 15 जणांना निवडण्याचं आव्हान होतं. त्यामध्येही आम्ही समतोल साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कोणी ना कोणीतरी मागे राहणार होतं. नुकत्याच झालेल्या मालिकेत त्यांनी उत्तम कामगिरी केली असेल पण त्यांच्याऐवजी कोणाला निवडण्यात आलं हे पाहणंही महत्त्वाचं आहे. ज्यांना निवडण्यात आलं आहे ते या जागेसाठी पात्र नाहीत का? असं असेल तर यावर चर्चा होऊ शकते," असं आगरकरने सांगितलं.
नक्की वाचा >> 'वा काय संघ आहे! ODI, टी-20 मधले शतकवीर वगळले, सिलेक्टर्सला कदाचित...'; थरुर संतापले
रिंकूचं नाव घेत दिलं उदाहरण
अजित आगरकरने अगदी नाव घेत रिंकू सिंहचं उदाहरण दिलं. रिंकूला टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या संघात स्थान मिळालं नव्हतं. काही खेळाडूंना वगळावं लागतं याबद्दल बोलताना आगरकरने, "आम्ही झिम्बावेविरुद्धच्या मालिकेत काही खेळाडूंना स्थान दिलं. त्यामुळे काही खेळाडू लयीत नसतील किंवा कोणाला दुखापत झाली तर आपल्याकडे आता बरेच पर्यायी खेळाडू निवडीसाठी उपलब्ध आहेत," असं सांगितलं. "मात्र हे निर्णय कठीण असतात. रिंकूची तर काही चुकही नव्हती तरी त्याला वर्ल्ड कपच्या संघात स्थान मिळालं नाही. तो एक उत्तम उदारण आहे. त्याने टी-20 मध्ये उत्तम कामगिरी केली. मात्र त्याला संघात स्थान मिळालं नाही. हे असं होतं राहतं आणि दुर्देवाने आम्हालाही 15 खेळाडूंमध्ये सर्वांना स्थान देता येत नाही," असं आगरकर म्हणाला.