मुंबई : काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड क्रिकेट संघाने (New Zealand Cricket Team) पहिला एकदिवसीय सामना सुरू होण्याच्या काही क्षण आधी सुरक्षेचं कारण देत पाकिस्तानचा दौरा रद्द केला. यानंतर वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने एक मिश्किल ट्विट केलं आहे. त्याच्या या ट्विटमुळे चाहत्यांना तो पाकिस्तानला जात आहे का असा प्रश्न पडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ख्रिस गेलने रात्री हे ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये गेल म्हणतो, "मी उद्या पाकिस्तानला जातोय. कोणी माझ्यासोबत येणार आहे का?"


तर आता ख्रिस गेलच्या चाहत्यांना मोठा प्रश्न पडला आहे की, गेल खरंच पाकिस्तानला जाणार का? गेलच्या या ट्विटवरून अनेकांनी त्याला प्रश्नही विचारले. मात्र या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. कारण आजपासून आयपीएल सुरु होणार असून त्यासाठी गेल युएईमध्ये दाखल झाला आहे. 


ख्रिस गेलच्या या ट्विटला पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद आमीरने उत्तर दिलं आहे. आमिरने लिहिलंय की, "लेजंड भेटू इथे." दरम्यान गेलने हे ट्विट पाकिस्तानच्या समर्थनार्थ केलं असल्याच्या चर्चा आहेत.


काही दिवसांपूर्वी पाकिस्तान-न्यूझीलंड मर्यादित षटकांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना रावळपिंडी स्टेडियमवर खेळवला जाणार होता. पण सामन्याची वेळ झाल्यानंतरही दोन्ही संघ आपापल्या खोलीतच होते. यानंतर न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट यांनी एक निवेदन जारी करत म्हटलं, आम्हाला जी माहिती मिळत आहे, त्यानुसार दौरा सुरु ठेवणं शक्य नाही.