पदार्पणाआधीच अंबाती रायुडूचा टेस्ट क्रिकेटमधून संन्यास
भारताचा क्रिकेटपटू अंबाती रायुडूनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे.
मुंबई : भारताचा क्रिकेटपटू अंबाती रायुडूनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये अधिक लक्ष केंद्रीत करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं रायुडूनं सांगितलं आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचं सांगितल्यामुळे त्याचे भारताच्या टेस्ट टीममध्ये पदार्पण करण्याचे दरवाजेही बंद झाले आहेत.
३३ वर्षांच्या अंबाती रायुडूनं ५ वर्षांच्या त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४५ वनडे आणि ६ टी-२० मॅच खेळल्या आहेत. रायुडूनं ४५ पैकी ११ वनडे २०१८ साली खेळल्या आहेत. रायुडूनं ११ मॅचमध्ये ५६ च्या सरासरीनं ३९२ रन केले आहेत. रायुडूला टेस्ट क्रिकेट खेळण्याची एकही संधी मिळालेली नाही. त्यामुळे टेस्ट क्रिकेट खेळण्याआधीच त्यानं या प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रायुडू आता रणजी ट्रॉफीही खेळणार नाही.
मी आंतरराष्ट्रीय आणि घरगुती स्तरावर मर्यादित ओव्हरच्या स्पर्धा खेळायच्या आहेत, असं रायुडूनं हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला सांगितलं. क्रिकेट खेळण्याची संधी दिली म्हणून रायुडूनं बीसीसीआय, एचसीए, बडोदा क्रिकेट असोसिएशन आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे आभार मानले आहेत. हैदराबादमध्ये खेळणं माझ्यासाठी नेहमीच सन्मान होतं. ज्या पद्धतीनं मला इकडे समर्थन मिळालं ते मी कधीच विसरू शकत नाही. यामध्ये माझ्याबरोबर खेळलेले खेळाडू, प्रशिक्षक आणि अधिकारी यांचा समावेश आहे.