`विराटने ठरवून नवीनचा गेम केला, गंभीरला...`, अमित मिश्राने सांगितला भांडणाचा खरा किस्सा
Amit Mishra On Virat kohli : मागील आयपीएलमध्ये (IPL Clash) विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली होती. त्यावर आता अमित मिश्राने खळबळजनक खुलासा केला आहे.
आयपीएल 2023 मध्ये विराट आणि गंभीर यांच्यात झालेल्या वादावर आता टीम इंडियाचा माजी स्टार फिरकीपटू अमित मिश्रा याने मोठा खुलासा केलाय. आरसीबी आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यादरम्यान आणि सामना संपल्यानंतर विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती. या भांडणात विराटची चूक होती, असं मत अमित मिश्राने (Amit Mishra Big Claim On IPL Clash) जाहीरपणे मांडलंय. एका मुलाखतीत अमित मिश्राने यावर भाष्य केलं.
विराट आणि लखनऊच्या खेळाडूंमधला हा वाद लखनऊमध्ये सुरू झाला नाही तर बंगळुरूमध्ये सुरू झाला होता. लखनऊच्या विजयानंतर गौतम गंभीरने आपल्या अॅग्रेशन स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केलं. त्यावेळी गंभीरने तोंडावर बोट ठेवून बंगळुरूच्या फॅन्सला शांत राहण्यास सांगितलं. बंगळुरूच्या फॅन्सने सामना डोक्यावर घेतला होता, त्यामुळे गंभीरने त्याप्रकारे सेलिब्रेशन केलं. मला वाटतं विराटला गंभीरचं हे कृत्य आवडलं नाही. आम्हाला वाटलं की, मॅच संपल्यावर विषय संपला असेल परंतू विराटसाठी हा विषय संपला नव्हता, असं मिश्रा सांगतो.
विराटला गंभीरचं कृत्य आवडलं नाही, त्यामुळे त्याने लखनऊच्या खेळाडूंशी पंगा घेण्यास सुरूवात केली. जेव्हा जेव्हा दोन्ही संघ भिडले तेव्हा विराटने खोड्या काढल्या. विराट हे सर्व विसरू शकला असता, परंतू त्याने सर्व लक्षात ठेवलं. जेव्हा लखनऊमध्ये सामना झाला, तेव्हा विराटने कायली मेअर्सविरुद्ध वाद घातला. कायली मेअर्सचा काहीच संबंध नव्हता तरी देखील त्याने खोड्या काढल्या. जेव्हा नवीन उल हक बॉलिंगला आला तेव्हा देखील विराटने पंगा घेतला. मी विराटची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
नवीन आणि मी बॅटिंग करत असताना मी विराटला म्हटलं, तो तरुण आहे, तो तुझ्या उंचीच्या बरोबर देखील नाही. जे झालं ते झालं, विषय सोड.. पण विराटने मला उलट उत्तर दिलं, तू ही गोष्ट त्याला सांग... मला नाही, असं अमित मिश्राने यावेळी म्हटलं. विषय इथंच थांबला नाही. सामना संपल्यानंतर हॅडशेक करताना पुन्हा विराटने नवीनला डिवचलं. गंभीरने मध्यस्थी केली. तु पुन्हा का सुरू केलंस, तुम्ही जिंकला आहात, असं गंभीरने यावेळी विराटला म्हटलं. परंतू हॅडशेक झाल्यानंतर नवीन पुन्हा आला अन् त्याने गंभीरला सांगितलं की विराटने पुन्हा डिवचणं सुरू केलंय.
दरम्यान, गंभीरला विराटच्या या गोष्टीचा राग आला आणि मैदानात राडा झाला. नवीन उल हक पुन्हा एकदा टीम इंडियाच्या फलंदाजाचा आदर करेल, असं मला वाटत नाही, असं मिश्राने यावेळी म्हटलं आहे.